लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : हृदयविकारामुळे गंभीर आजारी असलेल्या दोन महिन्यांच्या बाळाने कोरोनाला हरविले आहे. मूळच्या नंदूरबारच्या असणाऱ्या अगरवाल कुटुंबाला मुलगी झाली. एका महिन्यात या बाळाला हृदयविकार असल्याचे समोर आले. त्यानंतर नातेवाइकांना या बाळाला अंधेरीच्या एका रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला तिथल्या डॉक्टरांनी दिला.
त्या चिमुरडीवर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. बाळाला रुग्णालयात भरती केले, तेव्हाच ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचेही समजले. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या बाबतीत शस्त्रक्रियेनंतरच्या परिणामांवर विपरित प्रभाव पडण्याची शक्यता असते, त्यामुळे शस्त्रक्रिया दोन आठवड्यांनंतर करण्यात आली.
तब्बल दोन आठवड्यांनी कोरोनामुक्त झाल्यानंतर या मुलीला शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. अतिशय गुंतागुंतीची ओपन हार्ट करेक्टिव्ह कार्डियाक सर्जरी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात यशस्वीपणे पार पडली आणि शस्त्रक्रियेनंतर मुलीच्या तब्येतीमध्ये वेगाने सुधारणा घडून आली. उपचार, शस्त्रक्रिया यासाठी जवळपास संपूर्ण महिनाभर रुग्णालयात राहिल्यानंतर ही मुलगी घरी परतली.
चिल्ड्रेन्स हार्ट सेंटरचे संचालक डॉ.सुरेश राव यांनी सांगितले की, त्या मुलीचे वजन रुग्णालयात भरती करतेवेळी फक्त तीन किलो होते. ऑक्सिजन सॅच्युरेशन ८६ टक्के इतके कमी होते. या मुलीला जन्मजात हृदयविकार असल्याचे आढळून आले होते, या आजाराला ऑब्स्ट्रॅक्टेड टोटल अनोमलस पल्मनरी वेनस कनेक्शन (टीएपीव्हीसी) असे म्हणतात. तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते.
* शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नव्हता!
सर्वसामान्यतः फुप्फुसातून प्राणवायूने परिपूर्ण रक्त हृदयाच्या डाव्या झडपेमध्ये येते आणि तिथून ते संपूर्ण शरीराला पुरवले जाते, पण या बाळाच्या बाबतीत फुप्फुसाकडून येणाऱ्या रक्तवाहिन्या हृदयाच्या डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला जोडल्या गेलेल्या होत्या, त्यामुळे शरीराला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा होत नव्हता आणि फुप्फुसांवर भरपूर ताण येत होता. मुलीची स्थिती अतिशय गंभीर होती आणि तिच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते, आता या मुलीची प्रकृती स्थिर असून सुधारत आहे.
---------------------------