२५ हजार लोकसंख्येचा शून्य कचरा प्रकल्प, नागरिकांचा महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 03:02 AM2017-10-05T03:02:13+5:302017-10-05T03:02:33+5:30
शंभर किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करत असलेल्या सोसायटी, व्यावसायिक आस्थापनांचा कचरा २ आॅक्टोबरपासून उचलण्यात येणार नाही; अशा इशारा...
सागर नेवरेकर
मुंबई : शंभर किलोपेक्षा अधिक ओला कचरा निर्माण करत असलेल्या सोसायटी, व्यावसायिक आस्थापनांचा कचरा २ आॅक्टोबरपासून उचलण्यात येणार नाही; अशा इशारा महापालिकेकडून मिळताच नागरिकांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अशा सोसायट्यांना पालिकेकडून कचरा व्यवस्थापनासाठी तीनएक महिन्यांची वाढीव मुदत दिली जात आहे़ विशेष म्हणजे जुहू येथील नेहरू नगरमधल्या २५ हजार लोकसंख्येच्या वस्तीने शून्य कचरा मोहीम राबवित मुंबईकरांसमोर आदर्श निर्माण
केला आहे.
नेहरू नगर येथे आठवड्यापूर्वीपासून बायो कम्पोस्टिंग खत प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली होती. पालिकेने २ आॅक्टोबरला दिलेल्या तारखेप्रमाणे कचºयाची विल्हेवाट के/पश्चिम विभागाच्या मदतीने नेहरू नगर परिसरात उत्तमरीत्या करण्यात आली. दिवसाला १०० किलो कचरा टाकून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शून्य कचरा प्रकल्पाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे़ रहिवाशांमध्ये कचºयाच्या दुष्परिणामाबद्दल जनजागृती पालिकेकडून केली जात आहे. एका झोपडपट्टी विभागात कचºयाची विल्हेवाट योग्य पद्धतीने लावली जाते, त्याचप्रमाणे सोसायट्यांतील रहिवाशांनीही बोध घेतला पाहिजे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात संपूर्ण नेहरू नगरमधील रहिवाशांचा प्रतिसाद मिळेल, अशी आशा स्थानिकांनी व्यक्त केली आहे. नेहरू नगर परिसरातील कचरा व्यवस्थापन प्रकल्प परिसराच्या जवळ ‘प्लॅस्टिक क्रशिंग मशीन’ बसविण्यात आले आहे.
पालिकेच्या के/पश्चिम विभागातील जुहू-विलेपार्ले परिसरातील नेहरू नगर या झोपडपट्टी परिसरात उभारण्यात आलेल्या व ओल्या कचºयापासून खतनिर्मिती करणाºया कचरा व्यवस्थापन प्रकल्पाला आयुक्त अजय मेहता यांनी भेट दिली. २५ हजार लोकवस्तीच्या या प्रकल्पाचे कौतुक करीत आयुक्तांनी परिसरातील नागरिकांचे आणि संबंधित लोकप्रतिनिधींचे कौतुक केले.
कम्पोस्ट खताची प्रक्रिया
कम्पोस्ट प्रकल्पात मायक्रोबायल सोल्युशन वापरले जाते. यात जीवाणूंचा संच असतो. दीड लीटर पाण्यामध्ये ५ एमएल सोल्युशन टाकले जाते. पाण्यामध्ये सोल्युशन मिसळून खतांवर टाकले जाते. या प्रक्रियेने जीवाणूंची संख्या वाढते. या प्रक्रियेत नायट्रोजन, आॅक्सिजन, कार्बन डायआॅक्साईड आणि मिथेन वायू निर्माण होतात. या वायूंना एनएसटी (नो स्मेल प्रोडक्ट) केमिकल नष्ट करते. त्यामुळे प्रकल्पातून दुर्गंधी निर्माण होत नाही. परंतु, गुणधर्म असा आहे की, यात उष्णता निर्माण होते. साधारण ६७० डिग्री सेंटीग्रेट उष्णता निर्माण होते. उष्णता निर्माण झाल्याने गॅस आणि पाणी तयार होण्यास सुरुवात होते. उष्णता निर्माण झाल्यामुळे पाण्याचे रूपांतर वाफेत होते. त्यामुळेच या प्रकल्पात कुठल्याही प्रकारची दुर्गंधी निर्माण होत नाही. यात कोणत्याही प्रकारचे दुर्गंधीजन्य जीवाणू आणि सरपटणारे प्राणी निर्माण होत नाहीत. कचºयापासून चांगल्या प्रकारची खतनिर्मिती होते. साहजिकच
सफाई कामगारांनीदेखील काम करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत नाही.
३ महिन्यांची मुदतवाढ : मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाºया ५ हजार ३०४ निवासी तसेच व्यावसायिक संकुलांना कचºयाचे वर्गीकरण तसेच विल्हेवाटीसाठी खतनिर्मिती प्रकल्प साकारण्यासाठी नोटीस पालिकेने धाडली आहे. २ आॅक्टोबर उलटून गेला तरी सोसायट्यांनी लेखी स्वरूपात प्रकल्प उभारण्याची तयारी दाखवली आहे; त्यांनाच ३ महिन्यांची मुदतवाढ मिळणार आहे़
सोसायट्यांवर कठोर कारवाई
४० ते ४५ टक्के संकुलांनी लेखी स्वरूपात महापालिकेकडे अर्ज करून खतनिर्मिती प्रकल्प उभारण्याची हमी दिली आहे. अद्यापही ५५ ते ६० टक्के संकुलांनी खतनिर्मिती प्रकल्पाला सुरुवात केली नाही. सोसायट्यांना पालिकेचे अधिकारी भेट देऊन सोसायटींच्या पदाधिकाºयांना प्रकल्प साकारायला मदत करणार आहेत. संकुलांनी प्रतिसाद न दिल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे़
ज्या सोसायट्यांनी प्रकल्प साकारायची महापालिकेला हमी दिली
नाही, अशा सोसायट्यांमध्ये महापालिकेचे अधिकारी स्वत: दाखल
होत तेथील पदाधिकाºयांच्या समस्या जाणून घेणार आहेत. या सोसायट्यांना नोटीस मिळाली का? आणि मिळाल्यानंतरही त्यांनी प्रकल्प साकारण्यासाठी पुढाकार का घेतला नाही? याबाबत त्या सोसायट्यांच्या पदाधिकाºयांसोबत चर्चा करून समस्येचे निराकरण केले जाणार आहे. या सोसायट्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास त्यांना नोटीस काढून कारवाईचा निर्णय घेता येणार आहे.
100
किलोहून जास्त कचरा निर्माण करणाºयांमध्ये सोसायट्या, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, महाविद्यालय, हॉटेल्सचा समावेश आहे. अशा पाच हजार सोसायट्या व आस्थापना आहेत.
सध्या सात हजार ८०० मेट्रिक टन कचºयामध्ये दररोज तीन हजार मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया केली जात आहे.
सर्व पाच हजार सोसायट्यांनी कचºयावर प्रक्रिया सुरू केल्यास दररोज १८०० मेट्रिक टन कचºयाचा भार मुंबईच्या कचरा भूमीवरून कमी होणार आहे.
शाळांसमोरील कचरा उचलण्यास सुरुवात
हजारो विद्यार्थी शिकत असलेल्या मालवणीत, ७ शाळांच्या गेटसमोरचा कचरा उचलण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शाळांच्या गेटचे डम्पिंग ग्राउंड झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध करताच प्रशासनाने ही कारवाई केली.मालवणीत पालिकेच्या सेंट पॉल, भारतमाता, लिटिल वर्ड, सह इतर शाळा आहेत.
आठवड्याभरात तयार व्हा,
अधिकारी करणार पाहणी
1मुंबईतील सात ते आठ टक्के गृहनिर्माण सोसायट्यांनीच कचरा पुन:प्र्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. मात्र राजकीय दबावामुळे या नियमांवर अंमल न करणाºया सोसायट्यांवर महापालिका तूर्तास कारवाई करू शकत नाही. त्यामुळे या सोसायट्यांची तांत्रिक व व्यावहारिक अडचण जाणून घेण्यासाठी पालिका अधिकारी सोसायट्यांची पाहणी करणार आहेत. यात जाणीवपूर्वक कचरा प्रक्रियेला टाळाटाळ करणाºया सोसायट्यांचा कचरा उचलणे बंद करण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. याबाबत गुरुवारी बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे.
2मुंबईत दररोज शंभर किलो कचºयाची निर्मिती करणाºया सुमारे पाच हजार सोसायट्यांपैकी जेमतेम पाचशे सोसायट्यांनी कचºयावर प्रक्रिया सुरू केली आहे. तरीही अद्याप मोठा वर्ग सोसायटीच्या आवारात कचºयावर प्रक्रिया करण्याच्या विरोधात आहे. यामध्ये हॉटेल्स, रुग्णालय आणि मोठ्या सोसायट्यांचा समावेश आहे. २ आॅक्टोबरची डेडलाइन संपल्यानंतर आणखी थोडी मुदतवाढ देण्याची तयारी पालिकेने दाखवली आहे. मात्र ही मुदतवाढ मिळवण्यासाठी सोसायट्यांना हा प्रकल्प अंमलात आणू, असे लेखी द्यावे लागणार आहे.
3या सोसायट्यांना आपल्या आवारातील कचरा प्रकल्पाचा आढावाच पालिकेकडे सादर करावा लागणार आहे. हा आराखडा तपासून तो अंमलात येईल, याची खात्री पटल्यानंतर पालिका मुदतवाढ मंजूर करणार आहे.
जुहू-विलेपार्ले परिसरातील सुमारे २५ ते ३० हजार लोकवस्ती असलेल्या नेहरू नगर झोपडपट्टी परिसराजवळ महापालिकेच्या पुढाकाराने आणि ‘दत्तक वस्ती योजने’तील स्वयंसेवकांच्या मदतीने ‘शून्य कचरा मोहीम’ राबवली जात आहे.
- प्रशांत गायकवाड,
सहायक आयुक्त, के/पश्चिम विभाग
नेहरू नगर हा ४० हजार लोकवस्ती असलेला झोपडपट्टी परिसर आहे. इथे दररोज ६ टन कचरा जमा होतो. कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी पहिल्यांदा कम्पोस्ट खताचे दोन प्लांट तयार करण्यात आले आहेत. या प्लांटमध्ये २०० किलो कचरा राहू शकतो.
- उद्धव चंदनशिवे, अभियंता, के/पश्चिम
दिवसेंदिवस डम्पिंग ग्राउंडची परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. त्यादृष्टीने नेहरू नगर येथील कचरा योजनेमार्फत कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे बायोकम्पोस्टिंग प्रकल्प राबविला आहे. जेणेकरून लोकांना प्रोत्साहन मिळावे.
- विनोद तांबे, पालिका अधिकारी, के/पश्चिम