रंगकर्मी शिष्टमंडळाच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:10 AM2021-08-12T04:10:14+5:302021-08-12T04:10:14+5:30
मुंबई : ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचाखाली एकवटलेल्या कलावंतांनी ९ ऑगस्ट रोजी आंदोलन केल्यावर, मंगळवारी अभिनेते विजय पाटकर त्यांच्या ...
मुंबई : ‘रंगकर्मी आंदोलन, महाराष्ट्र’ या मंचाखाली एकवटलेल्या कलावंतांनी ९ ऑगस्ट रोजी आंदोलन केल्यावर, मंगळवारी अभिनेते विजय पाटकर त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत कलावंतांच्या बऱ्याच मागण्या मान्य झाल्याचे या मंचातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
विजय पाटकर यांच्यासह विजय राणे, मेघा घाडगे, संचित यादव, सुभाष जाधव, चंद्रशेखर सांडवे आदी रंगकर्मी यावेळी उपस्थित होते.
एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात किंवा मोकळ्या जागेत सादर होणाऱ्या कलांना तत्काळ परवानगी मिळावी व या लोकांना लोकल प्रवासाची परवानगी द्यावी, या मागणीवर ज्या जिल्ह्यामध्ये शिथिलता आहे, तिथे गर्दी न करता, या कला सादर करण्यासाठी मुभा देण्याची तयारी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी दर्शविली आहे.
फी न भरता आल्यामुळे ज्या रंगकर्मींच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. अशा रंगकर्मींची यादी तयार करून शासनाला सादर करावी. रंगकर्मींना गेल्या दीड वर्षात काम नसल्याने घरभाडे, वीजबिल भरण्यास अडचण होत आहे. अशा रंगकर्मींचीही यादी तयार करून शासनाला सादर करावी. नाट्यगृहे आणि सिनेमागृहे १ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल आणि इतरही कला सादर करण्यासाठीचा निर्णय घेण्यात येईल, तसेच महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी रंगकर्मी रोजगार हमी योजना लागू करण्यासाठी तत्त्वता मान्यता देण्यात आली आहे.
रंगकर्मींच्या शिष्टमंडळाने आमच्या कलांचे सादरीकरण करण्यासाठीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यासाठी प्रयत्न करावा, ही मागणी लावून धरली. त्यामुळे सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी ऑनलाइन पद्धतीने नोंद करावी. ‘रंगकर्मी बोर्डा’ची स्थापना करण्यासाठी मसुदा बनविण्यासाठी रंगकर्मींच्या प्रतिनिधींना सहभागी करून घ्यावे. मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मींना भाडेतत्त्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये सवलतीच्या दरात सोयीचा प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मींची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था होण्यासंबंधी लवकर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती या मंचातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात देण्यात आली आहे.