मुंबई : मुंबईवर कितीही मोठे संकट येऊ दे. मुंबई त्यातून सही सलामत बाहेर पडते, असे म्हणतात. चक्रीवादळातून मुंबई आता सावरत आहेच, पण त्यासोबत कोरोनावरही मात करत आहे आणि यासाठी लढत आहेत, आपले कोरोना योद्धे. यात मुंबई पोलिसांचा प्रामुख्याने समावेश असून, सोमवारच्या चक्रीवादळाच्या पावसात ताडदेव येथील नागरिकांनाही असाच काहीसा अनुभव आला. या व्यतिरिक्त येथील पोलीस कोरोना काळात नागरिकांचे प्रबोधन करत असून, आपल्यातल्या माणुसकीचे दर्शन घडवत आहेत.
मुंबईत सोमवारी धडकलेल्या तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ताडदेवमधील रजनी महाल परिसरात स्वत: वरिष्ठ पोलीस निरिक्षक संजय जगताप यांनी रस्त्यावर उतरून नागरिकांना मदत केली. या दरम्यान त्यांनी वाहतुकीला मार्गदर्शन करून योग्य ती वाट दाखविली. ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी १३ जानेवारी, २०२१ रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी प्रथम ताडदेवमधील लोकांच्या समस्या समजावून घेतल्या. लोक बाहेर का पडत आहेत, त्यांची कारण काय आहेत. हे आधी समजून घेतले. त्यानंतर, जे अनावश्यक कारणासाठी बाहेर फिरतात. मास्क घालत नाही, त्यांना २०० रुपयांचा दंड आकारून समज दिली.
ताडदेवमध्ये महिनाभरात ८ ते १० पोलिसांचा मार्च काढून लोकांना कोरोनाला घाबरू नका. नियमांचे पालन करा. कारण नसताना घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले. रात्री-अपरात्री कुणाला रुग्णालयात सोडायचे असेल, तर पोलिसांच्या वाहनाने सोडण्यात आले आहे. ताडदेव पोलीस ठाणे विभागातील ७-८ पोलीस बांधव कोरोनाबाधित झाले होते. त्यांनी कोरोनावर मात करून पुन्हा सेवा बजावण्यास सुरुवात केली. त्यांनी हार मानली नाही. जिद्द न हारता, कोरोनाला हरवून दाखविले. आता ते कोणतीच मनात भीती न बाळगता कर्तव्य बजावत आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतरही त्यांनी पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला, अशी माहिती पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण थोरात यांनी दिली.
ताडदेव पोलीस बांधवांना कोरोना झाल्यानंतर त्यांची बेडची व्यवस्था करण्यात आली. या काळात संजय जगताप यांनी स्वत: कोरोनाबाधित पोलीस बांधवांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची रोज फोन करून विचारपूस केली, तसेच त्यांनी काही हवं असल्यास ते पुरविण्याचे कामही जगताप यांनी केले. वरळीतील सरदार वल्लभभाई पटेल कोविड सेंटर हेही ताडदेव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येते. तेथेही पोलिसांनी सेवा बजावली.