Join us

पॉझिटिव्ह स्टोरी : लसस्वी भव: मोहीम; घरोघरी जाऊन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:06 AM

मुंबई : लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, लसीकरण ही केवळ स्वत:ची काळजी नसून राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून देण्यासाठी ...

मुंबई : लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी, लसीकरण ही केवळ स्वत:ची काळजी नसून राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून देण्यासाठी प्रभादेवीच्या सौरभ मित्रमंडळाने लसस्वी भव: ही मोहीम हाती घेतली आहे.

आपल्या कामगार नगरातील लोकांमध्ये त्यांनी जागरुकता निर्माण करीत प्रत्येकांना लसीकरण मोहिमेत सामावून घेण्याकरिता घरोघरी जाऊन प्रत्येकाची लसीकरण नोंदणीची मोहीम सुरू केली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे छोटेसे पाऊल टाकले आहे. लसीकरण मोहिमेला वेगवान करण्यासाठी सामाजिक संस्था, मंडळे, सेवाभावी संस्थांनी आपापल्या नगरात, चाळीत, बिल्डिंगमध्ये, वसाहतींमध्ये ही मोहीम राबविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असे आवाहनही सौरभ मित्रमंडळाने या मोहिमेच्या माध्यमातून केले आहे.

लसीकरणाचा वेग वाढावा, सामान्यांमध्ये लसीकरणाबाबत असलेली भीती दूर व्हावी म्हणून सौरभ मित्रमंडळाने जनजागृती मोहीम राबविताना, ज्यांनी अद्यापही लसीकरणाची नोंदणी केलेली नाही, त्यांची नोंदणी करून देण्याची मोहीम हाती घेतली आहे. आमचे मंडळ फार मोठे काही करीत नाहीये. आम्ही फक्त आमच्या नगरातील लोकांच्या लसीकरण नोंदणीची जबाबदारी घेतली आहे. ही जबाबदारी नसून हे राष्ट्रीय कर्तव्य आहे, ही भावना प्रत्येक मंडळाच्या-संस्थेच्या मनात आली, तर प्रत्येकाचा जीवही वाचणार आहे.

लसीकरणासाठी मंडळांनी आपापल्या विभागापुरता, नगरापुरता, बिल्डींगपुरताही सहभाग घेतला, तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण झालेले असेल. हेच आमचे ध्येय आहे. या ध्येयाच्या दिशेने जाणारे पहिले पाऊल आम्ही टाकलेय. आता इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन सौरभने केले आहे. लसीकरणाच्या नोंदणीसाठी आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन लोकांची ऑनलाईन नोंदणी करीत आहोत. लसीचा तुटवडा संपताच आम्ही लसीकरणाची वेळ आरक्षित करण्यासाठीही नागरिकांना सहकार्य करणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भारताची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा अधिक असूनही गेल्या १०० दिवसांत १४ कोटी भारतीयांनीही कोविड प्रतिबंधक लस घेतलेली नाही. दुसऱ्या लाटेपूर्वी लोकांमध्ये लसीकरणाबाबत प्रचंड उदासीनताही दिसत होती. कुणात फारसे गांभीर्य दिसत नव्हते. तसेच अनेक समज-गैरसमजामुळे लसीकरणाबाबत सामान्यांच्या मनात भीती होती. लोकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी आणि जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करीत असली तरी, ती यंत्रणा कमी पडतेय. परिणामत: लसीकरणाकडे सामान्य नागरिकांची पाठच असल्याचे चित्र दिसत आहे.