पॉझिटिव्हिटीच्या दरात घट, तरी मुंबई तिसऱ्या टप्प्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:05 AM2021-06-19T04:05:56+5:302021-06-19T04:05:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीच्या दरात घट झाली तरी महापालिकेने सावधगिरीसाठी मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना पॉझिटिव्हिटीच्या दरात घट झाली तरी महापालिकेने सावधगिरीसाठी मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पॉझिटिव्हिटीचा दर एक ते दोन टक्का आणि दररोजची रुग्ण संख्या पाचशेहून कमी झाल्यास मुंबईत दुसऱ्या टप्प्याचे निर्बंध आणण्याचा विचार करू, असे पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. त्यामुळे लोकल सेवा तूर्तास सर्वसामान्यांसाठी खुली होणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
गेल्या आठवड्यात मुंबईतील पॉझिटिव्हिटीचा दर ४.४० टक्के होता, तर शुक्रवारी हा दर ३.७९ टक्के एवढा खाली आला आहे. मुंबईचा समावेश दुसऱ्या टप्प्यात करताना निर्बंध शिथिल करण्याचे अधिकार मुंबई महापालिकेकडे सोपविण्यात आले आहेत. मात्र, चार आठवड्यांत मुंबईत तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे पॉझिटिव्हिटीचा दर एक टक्क्यावर येईपर्यंत मुंबई पूर्णपणे खुली करता येणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
तिसऱ्या टप्प्यात मुंबईतील दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, अद्याप हॉटेल, मॉल्स, चित्रपटगृह आदींवर निर्बंध कायम आहेत. कोरोना पॉझिटिव्हिटी दराचा प्रत्येक आठवड्याला आढावा घेण्यात येतो. त्यामुळे पुढच्या आठवड्यापर्यंत यामध्ये आणखी घट झाल्यास पूर्णवेळ दुकाने तसेच रेस्टॉरंट, व्यायामशाळा आदी ५० टक्के उपस्थितीने सुरू करण्यात येणार आहेत.
लोकल सेवेसाठी प्रतीक्षाच
रेल्वेद्वारे दररोज सरासरी ८२ लाख मुंबईकर प्रवास करीत असतात. मागच्या वेळी पुनश्च हरिओम केल्यानंतर ठराविक वेळेत महिला व पुरुष वर्गाला प्रवासाची परवानगी देण्यात आली होती. यावेळेसही मुंबई दुसऱ्या टप्प्यात आल्यास सर्वप्रथम महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुंबईत आजही बाधित रुग्णांची दररोजची संख्या ७५० ते ८०० पर्यंत आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्हिटीचा दर एक - दोन टक्के आणि दैनंदिन बाधित रुग्णांची संख्या पाचशेहून कमी होत नाही, तोपर्यंत मुंबई तिसऱ्या टप्प्यातच राहील.
- इक्बाल सिंह चहल (आयुक्त, मुंबई महापालिका)
मुंबई पहिल्या टप्प्यामध्ये आल्यानंतरही निर्बंध मात्र सध्याचेच सुरू राहतील. पुढील आठवड्यात कोणते निर्बंध राहतील, याचा निर्णय शनिवारी घेण्यात येईल. सर्व गोष्टींचा विचार करून टप्प्याटप्प्याने निर्बंध दूर केले जातील. मात्र, तज्ज्ञांनी दोन - चार आठवड्यांत तिसरी लाट येईल, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे लोकल प्रवासासाठी तूर्तास प्रतीक्षा करावी लागणार आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)