पदपथ फेरीवाल्यांच्या ताब्यात

By admin | Published: September 22, 2014 01:11 AM2014-09-22T01:11:31+5:302014-09-22T01:11:31+5:30

पादचा-यांना विनाअडथळा आणि सुरक्षित आपल्या इच्छित स्थळी जाता यावे यासाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले जातात

In the possession of the footpath hawkers | पदपथ फेरीवाल्यांच्या ताब्यात

पदपथ फेरीवाल्यांच्या ताब्यात

Next

नवी मुंबई : पादचा-यांना विनाअडथळा आणि सुरक्षित आपल्या इच्छित स्थळी जाता यावे यासाठी महापालिकेकडून रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार केले जातात. मात्र नवी मुंबईतील हेच पदपथ सध्या फेरीवाल्यांसाठी व्यवसाय करण्याचे हक्काचे ठिकाण बनले आहे. पालिका फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरील कारवाईस टाळाटाळ करत असल्याने शहरातील जवळपास सर्वच पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. काही पदपथांना मासळीबाजाराचे स्वरूप आले असून सर्वसामान्यांना पदपथावरून मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका रस्ते बांधणीप्रमाणे नवीन पदपथ तयार करणे व जुन्या पदपथांची दुरुस्ती करण्यावर दरवर्षी वर्षी करोडो रुपये खर्च करते. पादचाऱ्यांना चालण्याच्या उद्देशाने ही सुविधा तयार केली असली तरी सद्यस्थितीमध्ये शहरातील ७० टक्के पदपथांचा वापर पादचाऱ्यांना करता येत नाही. वाशी सेक्टर ९ मध्ये फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. सायंकाळी येथून चालणे मुश्कील होते. एपीएमसीजवळील पदपथांचीही परिस्थिती सारखीच आहे. येथे माथाडी भवन परिसरामध्ये दुकानदारांनी पदपथावर अतिक्रमण केले आहे. मसाला मार्केटजवळ तर सर्व्हिस रोड व पदपथावर भाजी व फळ विक्रेत्यांनी बस्तान मांडले आहे. मॅफ्को मार्केटजवळही अशीच स्थिती आहे.
कोपरीगाव येथे पदपथावर वाहने उभी केली जात आहेत. नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर सायंकाळी पूर्ण पदपथ भाजी व मासे विक्रेत्यांनी व्यापलेला असतो. सेक्टर २० मध्ये गॅरेज, हॉटेल व मटण विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. तुर्भे नाका येथे मटण विक्रेत्यांनी पूर्ण पदपथ ताब्यात घेतला आहे. महापालिकेचे विभाग अधिकारी प्रभावीपणे कारवाई करत नसल्यामुळे फेरीवाल्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असून भविष्यात गंभीर समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. परिमंडळ एकचे उपआयुक्त सुभाष इंगळे
यांच्याशी संपर्क साधला असता फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी विभाग अधिकारी व अतिक्रमण उपायुक्तांची असल्याचे सांगितले. अतिक्रमण विभागाशी संपर्क साधला परंतु कोणाशीही संपर्क होवू शकला नाही. (प्रतिनिधी)

Web Title: In the possession of the footpath hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.