Join us

संक्रमण शिबिराचे भाडे थकवणाऱ्या विकासकांकडून म्हाडा घेणार घरांचा ताबा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 1:00 AM

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने आपल्या संक्रमण शिबिराच्या थकीत भाडे वसुलीसाठी नुकतीच मोहीम सुरू केली आहे.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने आपल्या संक्रमण शिबिराच्या थकीत भाडे वसुलीसाठी नुकतीच मोहीम सुरू केली आहे. काही विकासकांनी पुनर्विकास योजनेसाठी म्हाडाच्या संक्रमण शिबिरांतील गाळे भाड्यावर घेतले होते. या गाळ्यांची थकबाकी आता १६७ कोटी रुपयांवर गेली आहे. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडून विशेष मोहीम हाती घेतली होती. यामध्ये ४४ विकासकांकडे ३,३५३ गाळे असून त्यांची थकबाकी १६६ कोटी ९२ लाख रुपयांवर गेली आहे. यामुळे आता इतकी मोठी थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान म्हाडासमोर आहे.म्हाडाच्या सेस इमारतींच्या पुनर्विकास योजनेमध्ये खासगी विकासकांचा सक्रिय सहभाग आहे. पुनर्विकास योजना राबवताना त्या घरातील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील घरे उपलब्ध करून दिली जातात. प्रकल्प झाल्यावर ही घरे म्हाडाला परत करणे बंधनकारक असते; मात्र विकासकांकडून ही घरे परत केली जात नाहीत. यामुळे ही घरे अन्य लोकांसाठी उपयोगामध्ये आणता येत नसल्याने म्हाडाने थकबाकीबाबत नव्याने आढावा घेण्याचा निर्णय घेतला. १६७ कोटींच्या घरात गेलेली थकबाकी वसूल करण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. गेल्या वर्षी थकबाकीची रक्कम साधारणत: १३० कोटी रुपयांवर गेली असल्याचा अंदाज म्हाडा मंडळाने काढला होता. या वेळी म्हाडाकडून विकासकांच्या कार्यालयास प्रत्यक्ष भेटीवर भर देण्यात आला. त्यानंतर थकबाकीदार विकासकांची सहा स्तरांवर वर्गवारी करण्यात आली.