Join us

पैशाचे वाटप करणारे पनवेल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: October 12, 2014 10:51 PM

निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना पैशाची लालूच दाखवू नये, याकरिता कडेकोट बंदोबस्त असतानाही पनवेलमध्ये आज दोन ठिकाणी रोख रकमेसह चार जणांना पोलिसांनी अटक केली

तळोजा : निवडणुकीच्या कालावधीत मतदारांना पैशाची लालूच दाखवू नये, याकरिता कडेकोट बंदोबस्त असतानाही पनवेलमध्ये आज दोन ठिकाणी रोख रकमेसह चार जणांना पोलिसांनी अटक केली. पनवेल खांदा कॉलनी परिसरातील मासळी बाजारात दुपारी कारवाई झाली तर पनवेल येथील अशोक बाग परिसरात संध्याकाळच्या सुमारास पोलिसांनी दुसरी कारवाई केली.दुपारच्यावेळी खांदा कॉलनी परिसरात पैसे वाटण्यास जाणाऱ्या सचिन पाटील (२७) व भुषण भोईर (२५) या दोघांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ५०० इतकी रोख रक्कम व मतदारांच्या पावत्या जप्त करण्यात आल्या आहेत. तर पनवेल येथील अशोक बाग परिसरात सायंकाळच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांना पनवेल पोलीस कर्मचाऱ्यांनी संशयास्पद फिरताना पाहून त्यांंची तपासणी केली असता प्रकाश दत्तात्रेय कांबळे (५०) व रोहित हरिश्चंद्र यादव (३०) यांच्याकडे १ हजार रुपयांची १०४ पाकीटे अशी एकूण १ लाख, ४ हजार इतकी रोख रक्कम सापडली असल्याचे पनवेल विभागाचे सहा. पोलीस आयुक्त शेषराव सुर्यवंशी यांनी सांगितले. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असताना पैसे वाटपाचे प्रकार समोर येत असून त्यामुळे पोलीस बंदोबस्त आणखी चोख करण्यात आला आहे. (वार्ताहर)