मुंबई : वेशांतर करून राज्यभरात वाहनांची चोरी करणाºया एकाला जुहू पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले. सय्यद शकील सय्यद युसुब असे या गाडीचोराचे नाव असून त्याला जालनामधून मुंबईत आणण्यात आले आहे. त्याच्यावर मुंबईसह राज्यभरात वाहनचोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.जुहूमध्ये काही दिवसांपूर्वी एक इनोव्हा गाडी चोरीला गेली होती. जुहू पोलीस या प्रकरणी चौकशी करत होते. याच दरम्यान पुणे गुन्हे शाखेने सय्यदला अटक केली. त्याचा ताबा नंतर जालना पोलिसांनी घेतला. त्यात ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांची उकल केली. याच प्रकरणी जुहू पोलिसांनी सय्यदचा ताबा घेतला. त्याच्याकडे या प्रकरणी चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील घोसाळकर यांनी दिली.मूळचा बुलडाण्याचा रहिवासी असलेला सय्यद हा २०१२ पासून वाहनचोरीमध्ये सक्रिय असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. त्याच्या अटकेमुळे राज्यातील वाहनचोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.चोरीच्या गाड्यांची तेलंगणात विक्रीसय्यद हा चलाख चोर असून जस्ट डायलच्या मदतीने एखाद्या टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स कंपनीत स्वत:च्या नावान गाडी बुक करायचा. त्यानंतर गाडी चालकासोबत मैत्री करायचा. रस्त्याच्या पलीकडचा ढाबा शोधून चालकाला काही पार्सल आणायला पाठवायचा आणि चालक रस्ता ओलांडून पलीकडे पोहोचला की गाडी घेऊन तो पसार व्हायचा. अनेकदा चालक मोबाइलदेखील गाडीतच ठेवत असल्याने मालकाला संपर्क करण्याचा मार्गही बंद व्हायचा. गाड्या चोरून तो त्या तेलंगणामध्ये विकायचा. तसेच चोरीच्या मोबाइल क्रमांकाचा वापर करत नवीन गाडी बूक करायचा आणि ती पळवायचा. सय्यदने अशाच अनेक शकला लढवत शेकडो गाड्यांची चोरी करून त्या विकल्याचा संशय पोलिसांना आहे.
कुख्यात वाहनचोर जुहू पोलिसांच्या ताब्यात, ७ गुन्ह्यांची उकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 2:01 AM