सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 02:51 AM2021-05-03T02:51:40+5:302021-05-03T08:00:01+5:30

देशातील निकालाचे थेट पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता कमीच

Possibility to change government only after municipal elections | सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच

सरकार बदलण्याची शक्यता महापालिका निवडणुकीनंतरच

Next
ठळक मुद्देदेशातील निवडणुकीचा निकाल पाहता येणाऱ्या काळात प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षांचे महत्त्व वाढीस लागेल. महाराष्ट्रात कोण, कोणाशी, कसे जुळवून घेतो यावर काँग्रेस आणि भाजपचे राज्यातील स्थान अधोरेखित होणार आहे.

अतुल कुलकर्णी

मुंबई : पश्चिम बंगालच्या निकालानंतर महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ मोहीम सुरू होईल, असे सांगणाऱ्या भाजपला आता त्यासाठी मुंबई महापालिकेची निवडणूक होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल. तोपर्यंत राज्यात काही बदल होतील, असे कोणतेही चिन्ह आज दिसत नाही. पंढरपूरच्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला यश मिळाले आणि तीन पक्षांसोबत लढताना कोणती रणनीती आखायची ते देखील कळाले. हाच काय तो या निवडणुकांचा अन्वयार्थ म्हणता येईल.  

भाजपने पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने एक वेगळी रणनीती यशस्वी करून दाखवली आहे. बहुजन समाजातील दुसऱ्या फळीचा नेता पक्षात घ्यायचा. त्याच्या मागे सर्व ताकद उभी करायची. त्याला स्थानिक मुद्यांची फोडणी द्यायची, आणि महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक जिंकायची, अशीही रणनीती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे सत्तेतील तीन तुल्यबळ पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढवत असताना त्यांना अपयश येणे आणि भाजपने यश मिळवणे, ही दखल घेण्याजोगी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ती साध्य करून दाखवली आहे. तिन्ही पक्षांनी एकत्र लढायचे ठरवले, तर प्रत्येक मतदारसंघात नाराजांची मोठी फौज उभी राहील. त्यातून भाजपला दुसऱ्या फळीतील अनेक नेते विविध मतदारसंघात मिळतील. त्यामुळे पंढरपूर पॅटर्न अनेक विधानसभा मतदारसंघात राबवणे भाजपला सहज शक्य होईल. हा एक वेगळा राजकीय विचार भाजपने यानिमित्ताने यशस्वीरित्या वापरून पाहिला आहे. मात्र, भालके यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली असती, तर ही रणनीती यशस्वी झाली असती का?, हा प्रश्न देखील आहेच. 

देशातील निवडणुकीचा निकाल पाहता येणाऱ्या काळात प्रत्येक राज्यात स्थानिक पक्षांचे महत्त्व वाढीस लागेल. महाराष्ट्रात कोण, कोणाशी, कसे जुळवून घेतो यावर काँग्रेस आणि भाजपचे राज्यातील स्थान अधोरेखित होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. सत्ताधारी पक्ष राष्ट्रवादी सोबत होते. तरीही पराभव झाला. याची कारणमीमांसा करण्याची गरज आहे. सत्ता  मिळाली की राष्ट्रवादीचे नेते जमिनीपासून दोन पावले वर चालतात. त्यांना कोणाची गरज वाटेनाशी होते, हा आजवरचा इतिहास आहे. त्याउलट सत्तेत असताना आणि नसताना भाजपचे महाराष्ट्रातील नेते ज्या पद्धतीने सगळ्यांशी वागतात, तो  गुण अन्य पक्षांनी नक्कीच घेतला पाहिजे.

राष्ट्रवादीला धोक्याची घंटा 
पंढरपूरच्या निकालाने महाविकास आघाडी सरकारला नाहीर; पण राष्ट्रवादीला धोक्याची घंटा दाखविली आहे. शरद पवार यांनी दिवंगत भालके यांच्या पत्नीला उमेदवारी द्यावी, असे सुचवले होते. मात्र राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठ नेत्यांनी भालके यांच्या मुलाचे नाव आग्रहाने लावून धरले. भालके यांच्या पत्नीना उमेदवारी दिली नाही. 

तिघांचा नको तेवढा संयम अडचणीचा
पंढरपूर जरी भाजपला मिळाले असले तरी, भाजप विस्कळीत आहे. जुनेजाणते नेते फारसे सक्रिय नाहीत. अनेक पक्ष फिरून भाजपमध्ये आलेल्या नेत्यांची पक्षात चलती आहे. ही अस्वस्थता दूर करणे भाजपचे प्रमुख काम ठरणार आहे. ज्या तडफेने ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल निवडणूक जिंकली, ती तडफ काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने दाखवण्याची गरज आहे. मात्र या तिघांचा नको तेवढा संयम त्यांच्यासाठीच अडचणीचा ठरू शकतो.

देवेंद्र फडणवीस, अमित शहा किंवा मी आम्ही तिघांपैकी कोणीही महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होईल, असे अधिकृतपणे बोललेलो नाही. महाविकास आघाडी सरकार स्वतःच्या अंतर्गत विरोधातून पडेल. लोकांच्या मनात राग आहे. 
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

आम्ही तिन्ही पक्ष एकत्र व मजबूत आहोत. त्यामुळे महाराष्ट्रात लगेच काही वेगळे घडेल या म्हणण्याला काहीही अर्थ नाही. जर भाजपने फोडाफोडी केली तर महाराष्ट्रातील जनता त्यांचा रोष दाखवून देईल. कोरोनाची साथ असल्यामुळे आम्ही संयमाने वागत आहोत. 
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

देशातील निकालामुळे महाराष्ट्रावर काहीही परिणाम होणार नाही. जी भाजप प्लासीच्या लढाईत पराभूत झाली तिने सह्याद्री जिंकण्याची स्वप्न बघू नयेत.
- नवाब मलिक, राष्ट्रीय प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस

पंढरपूरमध्ये स्थानिक गणिते होती. उमेदवारीविषयी काही वेगळे मतप्रवाह होते. त्यामुळे एक विधानसभेची जागा जिंकली, म्हणजे महाराष्ट्राचे गणित बदलेल. तीच पद्धत सगळीकडे वापरली जाईल, असे म्हणणे चुकीचे आहे. 
- खा. संजय राऊत, शिवसेना नेते

Web Title: Possibility to change government only after municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.