मुंबई : लाखो पगारदार मध्यमवर्गीयांचा आधार असलेली भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतनाची हजारो करोडाची रक्कम बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या क्षेत्रातील तज्ञांच्या मते इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग फायनान्शियल सर्विसेस (IL&FS) या ग्रुपमध्ये जवळपास १५ ते २० हजार कोटीच्या भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतनाच्या निधीची गुंतवणूक करण्यात आलेली असून आता ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
गुंतवणूक तज्ञांच्या मते, IL&FS वर ९१ हजार कोटीचे कर्ज आहे. यामुळे त्यांना कर्ज स्वरुपात निधी देणाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. रेग्युलेटरी फाइलिंगच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार, IL&FS कडे ९१ हजार कोटीचे कर्ज असून यातील ६१ टक्के रक्कम बँकेची आहे तर उर्वरित रक्कम कर्जरोखे आणि कमर्शिअल दस्तावेजावरील कर्जातून मिळालेली आहे. तसेच भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्समधील एकूण रक्कमेचा अधिकृत आकडा अद्याप सांगता येत नसला तरी ही रक्कम IL&FS ला बँक, म्यूचुअल फंड आदी योजनांकडून प्राप्त निधीपेक्षा भिन्न आहे. यामुळे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सच्या माध्यमातून गुंतवणूक झालेल्या २० हजार कोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
AAA मुळे झाली गुंतवणूक IL&FS या कंपनीला AAA अर्थात गुंतवणुकीस सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त आहे. तसेच अशा कंपनीमधील गुंतवणूक चांगला परतावा सुद्धा देते. यामुळे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन निधीचे व्यवस्थापन करणाऱ्या काही फंड्सने IL&FS चे काही बॉंडस खरेदी केले. मात्र आता ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्याने या बॉड्सच्या माध्यमातून गुंतवलेली २० हजार कोटीची रक्कम बुडण्याची भीती निर्माण झाली आहे.
बँकासुद्धा बुडण्याची शक्यता IL&FS मध्ये सर्वात जास्त रक्कम येस बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आणि बँक ऑफ बडोदा यांची अडकली आहे. मात्र यात बँकांमध्ये कोणत्या भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्सची रक्कम अडकलेली आहे याची माहिती अद्याप कळू शकली नाही. एका बँकर तज्ञाच्या मते, 'IL&FS या ग्रुपचे ४० टक्के बॉंड्स हे भविष्य निर्वाह व निवृत्ती वेतन फंड्स कडे असण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत IL&FSकडून कुठलीही माहिती मिळू शकली नाही.