कोकणात अवकाळी पावसाची शक्यता
By admin | Published: April 30, 2017 09:09 AM2017-04-30T09:09:47+5:302017-04-30T09:09:47+5:30
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतेय.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30- गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमानात सातत्याने वाढ होताना पाहायला मिळतेय. मात्र या वाढत्या तापमानातून कोकणवासीयांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
उन्हाच्या काहिलीनं राज्य होरपळत असताना येत्या 24 तासांत दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. राज्यात सर्वत्र उन्हाच्या प्रचंड तडाख्यानं लोकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तर महाराष्ट्रात उष्माघातानं आतापर्यंत 11 बळी गेल्याचंही समोर आलं आहे.
महाबळेश्वर आणि रत्नागिरीत कमाल तापमान 34 अंशांपर्यंत नोंदवलं गेलं आहे. भीरा येथे तापमान पुन्हा 43 अंशांपर्यंत गेलं आहे, तर विदर्भातल्या अकोल्यातही 43, अमरावती 40, ब्रह्मपुरी 45, बुलडाणा 39, चंद्रपूर 44, नागपूर आणि वर्धा येथे 43, यवतमाळमध्ये 42 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवलं गेलं आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या काळात उष्मा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील तापमानात मोठी वाढ नोंदवली गेली असली तरी दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात पुढील 24 तासांत गडगडाटासह पावसाच्या सरींची शक्यता स्कायमेटनं वर्तवली आहे.