देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. दहशतवादी ड्रोन आणि छोट्या विमानांच्या साह्याने मुंबईत दहशतवादी हल्ले करू शकतात, असे सांगण्यात आले आहे. या माहितीनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
मिळालेल्या माहितनुसार, मुंबईत रिमोट कंट्रोल विमानातून हल्ल्याचा इशाराही आहे. मुंबईतील प्रमुख ठिकाण दहशतवाद्यांचे लक्ष्य नसून, दहशतवादी व्हीव्हीआयपींनाही लक्ष्य करू शकतात, असे बोलले जात आहे. मुंबईत सध्या ड्रोन उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, जर कोणी या नियमांचे उल्लंघन केले तर त्याला आयपीसी कलम १८८ अंतर्गत शिक्षा केली जाईल.
बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांनी आदेश जारी केला आहे. दहशतवादी आणि देशद्रोही घटक ड्रोन, रिमोट कंट्रोल मायक्रो लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडरचा वापर करून हल्ला करू शकतात आणि व्हीव्हीआयपींनाही टारगेट करू शकतात. त्यामुळेच खासगी हेलिकॉप्टर ते हॉट एअर बलूनसह या सर्व गोष्टींच्या वापरावर पुढील ३० दिवस बंदी घालण्यात आली आहे. या काळात फक्त मुंबई पोलीस हवाई पाळत ठेवू शकतात. हा आदेश १३ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
याआधी ४ नोव्हेंबरलाही मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ल्या संदर्भात धमकी आली होती. धमकी मिळाल्यानंतर मुंबईतील तारदेव पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलीस आणि बॉम्ब शोधक व निकामी पथकाच्या व्हॅनच्या माध्यमातून संपूर्ण परिसराची झडती घेण्यात आली, मात्र काहीही सापडले नाही. फोन करणारा अज्ञात होता आणि पोलिसांनी नंतर दावा केला की धमकी देणारा मानसिक आजारी होता.
या घटनेमुले परिसरात गोंधळ उडाला होता. पण, मुंबई पोलिसांनी वेळेत घटनास्थळी धाव घेत शोध घेतला होता.