मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी मुंबईतील आयपीएल सामन्यांच्या आयोजनावर गंभीर चर्चा झाली. देशात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे सावट असताना यंदाची आयपीएल होणार की नाही, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, ‘आयपीएलविषयी राज्य सरकारकडे दोनच पर्याय असून एकतर आयपीएल रद्द व्हावी किंवा हे सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात यावेत.’
बुधवारी मुंबईत कोरोना विषाणूग्रस्त दोन रुग्ण आढळल्यानंतर टोपे यांनी आयपीएल आयोजनावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, ‘एक तर सरकारकडून या सामन्यांच्या आयोजनासाठी परवानगी मिळू शकणार नाही किंवा हे सामने केवळ टीव्ही प्रेक्षकांपुरते मर्यादित करावे.’ त्याचप्रमाणे, ‘एक गोष्ट नक्की आहे, की या सामन्यांसाठी तिकिट विक्री होणार नाही,’ अशी माहिती राज्य सरकारातील एका सूत्राकडून मिळाली.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यंदा मुंबईतील आयपीएल सामने प्रेक्षकांविना होण्याची दाट शक्यता आहे. २९ मार्चला वानखेडे स्टेडियमवर यंदाच्या आयपीएलला सुरुवात होत असून, पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांमध्ये रंगेल. बुधवारीच मुंबईतही कोरोनाग्रस्त दोन रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या ७ झाली आहे. त्यामुळेच राज्य सरकारकडून या विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जात आहेत.