चोरीच्या रकमेपेक्षा पैसे वाढण्याची शक्यता?
By admin | Published: July 10, 2016 12:44 AM2016-07-10T00:44:22+5:302016-07-10T00:44:22+5:30
वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत जवळपास ८ कोटी ९० लाखांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यानंतर, अटकेतील किरण
ठाणे : वागळे इस्टेट येथील चेकमेट सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीतील दरोड्याप्रकरणी आतापर्यंत जवळपास ८ कोटी ९० लाखांची रोकड ठाणे पोलिसांनी हस्तगत केली आहे. त्यानंतर, अटकेतील किरण साळुंखे याच्या नातेवाईकाच्या घरी शनिवारी पहाटे पैशांनी भरलेली आणखी एक गोणी पोलिसांना मिळाली आहे. त्या गोणीतील पैशांचे सध्या मोजण्याचे काम सुरू आहे. मात्र, ती रक्कम किती, हे अद्यापही पोलिसांकडून स्पष्ट झालेले नाही. परंतु दरोड्यात गेलेल्या रकमेपेक्षा ती रक्कम वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे.
चेकमेट दरोडाप्रकरणी ठाणे पोलिसांनी एकूण १५ दरोडेखोरांना जेरबंद केले, तसेच त्यांच्याकडून सुमारे ८ कोटी ९० लाखांची रक्कम हस्तगत केली.
याचदरम्यान, नाशिकमधील किरण साळुंखे याच्या घरी पैसे असल्याची माहिती वागळे इस्टेट गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, शुक्रवारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नाशिकला रवाना झाले होते.
या पथकाने केलेल्या तपासणीत साळुंखे याच्या पत्नीच्या मैत्रिणीच्या घरी पैशांनी भरलेली गोणी मिळून आली आहे.
याबाबत, पोलिसांनी पैसे मिळाल्याचा दुजोरा देऊन ती रक्कम किती आहे, हे सांगता येणार नाही, तसेच त्या पैशांचे मोजणे सुरू असल्याचे सांगून याबाबत अधिक बोलणे पोलिसांनी टाळले.
दरोड्यात ९ कोटी १६ लाख गेल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. तिचे नाशिकमधील एका शेतात वाटप करताना, ६० आणि ४० टक्क्यांचा फॉर्म्युला वापरला गेला होता.
त्यानुसार, सापडलेल्या ‘त्या’ गोणीत ६० लाख किंवा ४० लाख रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरून दरोड्यातील ती रक्कम वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
आणखी एक जण फरार
या दरोड्यात नाशकातील निनाद चव्हाण हा आणखी एक जण फरार आहे, तसेच आतापर्यंत
१५ जणांना या प्रकरणी
बेड्या पडल्या असून, त्यातील १० जण हे नाशकातील तर ५ जण ठाण्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.