लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आंतरराष्ट्रीय वाहन परवान्याची (आयडीपी) मुदत संपली, पण वाहनचालक परदेशात असेल तर त्यांच्यासाठी खूशखबर आहे. परदेशातूनही भारतीय आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांचे नूतनीकरण करता येईल. येत्या १५ फेब्रुवारीपासून ही प्रणाली लागू होणार आहे.
परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी सांगितले की, हे एक चांगले पाऊल आहे आणि कोरोनाच्या काळात परदेशात असणाऱ्या अनेक भारतीयांना त्याचा फायदा होईल. परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांना आयडीपीच्या नूतनीकरणाच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. यामुळे त्यांना मदत होईल.
नागरिक परदेशात असताना आतापर्यंत आयडीपींचे नूतनीकरण करण्याची कोणतीही यंत्रणा नव्हती. आता भारतीय नागरिक परदेशातील भारतीय दूतावास/मिशनच्या माध्यमातून नूतनीकरणासाठी अर्ज करू शकतात, जिथून हा अर्ज भारतातील वाहन पोर्टलवर जाईल. संबंधित आरटीओंचा सल्ला घेतला जाईल. परदेशातील नागरिकांना त्यांच्या पत्त्यावर आयडीपी कुरिअर केले जाईल, असे ढाकणे म्हणाले.
नूतनीकरणाचे शुल्क २००० रुपये असेल, जे अर्जदारांना ऑनलाइन द्यावे लागेल. त्यांना अर्जासह पुरावे द्यावे लागतील, ज्यात वैध ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्टच्या तीन छायांकित प्रती, राष्ट्रीयत्वाचा पुरावा आदींचा समावेश आहे.
.....................