सलमान खान सुटण्याची शक्यता

By admin | Published: December 10, 2015 02:33 AM2015-12-10T02:33:40+5:302015-12-10T02:33:40+5:30

सलमान खानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याची साक्ष हा हिट अ‍ॅण्ड रन केसचा पाया होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा पायाच ठिसूळ असल्याचे म्हटले आहे. पाटीलची साक्ष अविश्वासार्ह आहे.

The possibility of Salman Khan to go | सलमान खान सुटण्याची शक्यता

सलमान खान सुटण्याची शक्यता

Next

मुंबई : सलमान खानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याची साक्ष हा हिट अ‍ॅण्ड रन केसचा पाया होता. मात्र, उच्च न्यायालयाने हा पायाच ठिसूळ असल्याचे म्हटले आहे. पाटीलची साक्ष अविश्वासार्ह आहे. त्याच्या साक्षीच्या समर्थनार्थ सरकारी वकिलांनी एकही पुरावा सादर केलेला नाही, असे निरीक्षण बुधवारी उच्च न्यायालयाने नोंदवले. उच्च न्यायालयाच्या या निरीक्षणामुळे सरकार पक्षाला धक्का बसला आहे. त्यामुळे सलमान खान सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
> पाटीलची साक्ष अविश्वासार्ह
मुंबई : हिट अँड रन खटल्यात अभिनेता सलमान खानचा पोलीस बॉडीगार्ड रवींद्र पाटील याची साक्ष अविश्वासार्ह आहे. त्याच्या साक्षीच्या समर्थनार्थ सरकारी वकिलांनी एकही पुरावा सादर केलेला नाही, असे निरीक्षण बुधवारी उच्च न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणाचे निकालवाचन अंतिम टप्प्यात असून गुरुवारी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
अपघात घडल्यानंतर रवींद्र पाटील यानेच सलमानविरुद्ध वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला. त्याने केलेल्या तक्रारीनुसार, सलमानला गाडी वेगाने न चालवण्याची वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करत, त्याने गाडी वेगाने चालवली. त्यामुळेच गाडीचा अपघात झाला आणि त्यात एकाचा मृत्यू, तर अन्य चार जण जखमी झाले. एफआयआरमध्ये सलमानने मद्यपान करून गाडी चालवल्याचा उल्लेख पाटील यांनी केला नव्हता. दंडाधिकाऱ्यांपुढे जबानी देताना सलमानने मद्यपान केले होते की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले.
पाटील यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे जबानी बदलली. पाटील यांची साक्ष अंशत: विश्वासार्ह आहे, असे मान्य केले, तरी आवश्यक असलेले समर्थनार्थ पुरावे सरकारी वकिलांनी सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांची साक्ष अविश्वासार्ह आहे, असे न्या. ए. आर. जोशी यांनी सांगितले.
रवींद्र पाटील याचा मृत्यू २००७मध्ये झाला. त्यामुळे सत्र न्यायालयात त्यांची साक्ष नोंदवता आली नाही आणि बचावपक्षाच्या वकिलांना त्यांची उलटतपासणीही घेता आली नाही. सरकारी वकिलांनी पाटील यांनी दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या जबानीची प्रत सत्र न्यायालयापुढे सादर केली. त्यावर बचावपक्षाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. सत्र न्यायालयाने पाटील यांची साक्ष ग्राह्य धरूनच सलमानला दोषी ठरवत, पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. मात्र, न्या. जोशी यांनी या साक्षीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. (प्रतिनिधी)

Web Title: The possibility of Salman Khan to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.