लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग मिळावा, म्हणून महाराष्ट्र एसटी कामगार संघटना संपाच्या पवित्र्यात आहे. त्यासाठी संघटनेकडून मतदान प्रक्रिया शुक्रवारी सुरू झाली आहे. मात्र या अवास्तव मागणीमुळे एसटी प्रशासन अडचणीत येणार असल्याचा आरोप करत अन्य १३ संघटनांच्या कृती समितीने या संपाला विरोध केला आहे.कृती समितीचे निमंत्रक आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले की, मान्यताप्राप्त संघटनेने केलेली मागणी अवाजवी असून आघाडी सरकारच्या काळात याच युनियनने अयोग्य करार केल्याने कामगारांच्या वेतनात तफावत निर्माण झाली आहे. ही तफावत टप्प्याटप्प्याने भरून काढण्यासाठी कृती समितीने ५२ टक्के पगारवाढीचा वेतन करार करण्याची मागणी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली आहे. एसटी कामगारांच्या अनेक मागण्या मार्गी लागत असताना संपाची घाई करणे अयोग्य आहे.याउलट एकाच वेळी कराराची चर्चा करताना सातवा वेतन आयोग मागणे दुटप्पीपणा असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. मतदानाची प्रक्रियाच पारदर्शी नसल्याने मान्यताप्राप्त संघटनेला संपासाठी बहुमत मिळेल. कामगारांच्या अज्ञानाचा फायदा घेत मान्यताप्राप्त संघटना मान्यता टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. यात एसटी कामगारांचे नुकसान होणाऱ्या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याचे बरगे म्हणाले.
कामगार संघटनांमुळे एसटी अडचणीत येण्याची शक्यता
By admin | Published: May 27, 2017 3:06 AM