मुंबईत दोन जागांसाठी तिरंगी लढतीची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:35 PM2021-11-24T12:35:47+5:302021-11-24T12:37:41+5:30

विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांनी अर्ज दाखल केला.

Possibility of triangular contest for two seats in Mumbai | मुंबईत दोन जागांसाठी तिरंगी लढतीची शक्यता

मुंबईत दोन जागांसाठी तिरंगी लढतीची शक्यता

Next

मुंबई  : विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी मुंबई काँग्रेसचे पदाधिकारी सुरेश कोपरकर यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसने अधिकृतपणे उमेदवारी जाहीर केली नसतानाही कोपरकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की तिरंगी लढत होणार, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 

 विधान परिषदेच्या मुंबई स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १० डिसेंबरला मतदान होणार आहे. दोन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांसाठी आज शिवसेनेकडून माजी आमदार सुनील शिंदे यांनी अर्ज दाखल केला. वरळी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी वरळीवरील दावा सोडला होता. विधान परिषदेची उमेदवारी देत शिवसेनेने सुनील शिंदे यांचे पुनर्वसन केले आहे. तर, भाजपकडून राजहंस सिंह यांनी सोमवारी आपला अर्ज दाखल केला होता. महापालिकेतील सर्वपक्षीय संख्याबळ लक्षात घेता शिवसेना आणि भाजपचा उमेदवार सहजपणे निवडून येण्याची शक्यता होती. काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने अधिकृत उमेदवार दिला नाही. त्यामुळे शिवसेनेचे सुनील शिंदे आणि भाजपच्या राजहंस सिंह यांची बिनविरोध निवड होईल असे मानले जात होते. दरम्यान, आज काँग्रेसच्या सुरेश कोपरकर यांनी अर्ज दाखल करून दाखल केल्याने तर्कवितर्क लढविले जात आहेत. 

भाजपला धक्का देण्याची रणनीती 
कोपरकर हे उद्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांची भेट घेणार असणार असल्याचे समजते. या भेटीनंतर काँग्रेस त्यांना अधिकृत पाठिंबा जाहीर करेल असे सांगण्यात येत आहे. कोपरकर हे पालिकेत नगरसेवक होते. सध्या त्यांच्या पत्नी नगरसेविका आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांकडून त्यांना पाठिंबा दर्शविला जाईल, असे सांगण्यात येत आहे. तर, भाजपने राजहंस सिंह यांना उमेदवारी दिल्याने भाजपमधील एक गट नाराज आहे. या नाराज गटाला सोबत घेऊन निवडणुकीत धक्का देता येईल, असा अंदाज काँग्रेसमध्ये बांधला जात आहे. काँग्रेसचे नगरसेवक, शिवसेनेची अतिरिक्त मतांसह समविचारी पक्षांच्या सदस्यांची मोट बांधून भाजपला धक्का देण्याची रणनीती आखली जात आहे.
 

Web Title: Possibility of triangular contest for two seats in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.