ज्येष्ठांना पोस्ट खात्याचा आधार; मिळतोय सर्वाधिक व्याजदर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2023 01:24 PM2023-11-27T13:24:02+5:302023-11-27T13:25:27+5:30
८ महिन्यांत २३ हजारांहून अधिक खाती उघडण्यात आली.
मुंबई : तुम्ही बँकांमध्ये एक, दोन अथवा पाच वर्षांसाठी पैशांची एफडी स्वरूपात गुंतवणूक करत असाल तर विचार करणे गरजेचे आहे. बँकांपेक्षा पोस्टाच्या माध्यमातून चांगला परतावा मिळू शकतो. पोस्टाचा व्याजदर बँकांपेक्षा अधिक असून, टाइम डिपॉझिट योजना बँकांच्या मुदत ठेव योजनांना टक्कर देत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाच्या माध्यमातून बचत योजना चालवली जाते. त्यासाठी ८.२ टक्के व्याजदर दिले जाते.मुंबई क्षेत्रात टपाल विभागात एप्रिल ते २३ नोव्हेंबर या कालावधीत आतापर्यंत २३ हजार ८२३ ज्येष्ठ नागरिकांनी आपले खाते सुरू केले आहेत, अशी माहिती टपाल विभागाने दिली. या योजनेत परतावा हमखास मिळतो, ही सरकारची लहान बचत योजना असल्याने ती ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात सुरक्षित आणि सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक पर्यायांपैकी एक आहे.
ही योजना ठरतेय हिट:
ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही ६० वर्षांवरील नागरिकांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षांनी ठेवी परिपक्व होतात. मात्र, हा कालावधी आणखी तीन वर्षांसाठी वाढवता येतो. सार्वजनिक, खासगी क्षेत्रातील बँका आणि पोस्ट ऑफिसद्वारे या योजनेचे खाते उघडता येते.
विविध योजनांचा व्याजदर चांगला
पोस्टात विविध योजनांना चांगला व्याज दर मिळत आहे. त्यात ज्येष्ठ नागरिक बचत खाते ८.२ टक्के, राष्ट्रीय बचत खाते ७.७ टक्के, १ वर्षे मुदत ठेव ६.८ टक्के, २ वर्षे मुदत ठेव ६.९ टक्के, ३ वर्षे मुदत ठेव ७.० टक्के, ५ वर्षे मुदत ठेव ७.५ टक्के, आरडी ५ वर्षे ७.२ टक्के, किसान विकास पत्र ७.५ टक्के, मासिक उत्पन्न योजना ४.५ टक्के, बचत खाते ४.० टक्के, भविष्य निर्वाह निधी ७.१ टक्के एवढे व्याज मिळत आहे.
म्हणून पोस्टाकडे वाढतोय कल :
खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी ज्येष्ठ बचत खाते परिपक्व होते. व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी जमा होत असते.
६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांबरोबरच पोस्टातील ठेवींची संख्यादेखील वाढली आहे. खाते उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी ज्येष्ठ बचत खाते परिपक्व होते. व्याजाची रक्कम दर तीन महिन्यांनी जमा होत असते. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून बँकांबरोबरच पोस्टातील ठेवींची संख्यादेखील वाढली आहे.