लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविडनंतरही रुग्णांच्या शारीरिक समस्यांसह मानसिक समस्या वाढत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिका रुग्णालयात सुरू झालेल्या पोस्ट कोविड बाह्य विभागात रुग्णांची गर्दी वाढत असल्याचे दिसून येत आहेत. शिवाय, खासगी रुग्णालयांमध्येही विविध दीर्घकालीन समस्या घेऊन रुग्ण उपचारांसाठी पुढे येत असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
कोविड काळात ज्यांना आधीपासूनच डोळ्यांचे आजार होते. त्यांच्या समस्या अधिक बळावल्या. मोतिबिंदू, पडदा सरकणे अशा समस्या जास्त वाढल्या आहेत. पण, आता रुग्णालये सुरु झाल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. ज्यांना कधीच डोळ्यांचा आजार नव्हता, अशा लोकांमध्ये डोळ्यांतील रेटिनाच्या रक्तवाहिनीत गुठळ्या होऊन त्या बंद होऊन दृष्टी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत असे चार ते पाच रुग्ण नायर रुग्णालयात उपचारांसाठी आले होते. ज्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याशिवाय पर्याय नव्हता. ज्या रुग्णांनी वेळेत येऊन उपचार घेतले, त्यांचे आजार कमी झाले. मात्र, ज्यांच्या आजाराने जोर धरला होता त्यांच्या आजारांना बरे होण्यासाठी वेळ लागल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. दीपिका पेहलवानी यांनी सांगितले.
कोविडमध्ये सर्वात जास्त परिणाम हा फुप्फुसावर होत आहे. त्यासंबंधित अनेक विकार आता समोर आले आहेत. त्यातही पोस्ट कोविडमध्ये फुप्फुसावर झालेला परिणाम हा सर्वाधिक आहे. त्यातही लोकांमध्ये फुप्फुसाचा पल्मनरी फायब्रोसिस होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, अजूनही बरेच रुग्ण या आजारासह वेगवेगळ्या रुग्णालयात सुरू केलेल्या पोस्ट कोविड ओपीडीत येत आहेत. मात्र, फायब्रोसिस हा सावकाश बरा होणारा आजार असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञ डॉक्टरांनी मांडला आहे. फुप्फुसांमध्ये मिलियन्स वायुकोश असतात. कोविड-१९ हा आजार होऊन गेल्यानंतर फुफ्फुसांमध्ये काही काळ न्युमोनिया व त्याचबरोबर रक्त गोठल्याने झालेला थ्रम्बोसिस बरे व्हायला लागतात. यात फुफ्फुसाचे प्राणवायू शोषणाचे कार्य मंदावलेले दिसते. त्याकरिता योग्य काळजी घेतल्यास बहुतांश बरे होत आहेत, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. सागर शाह यांनी सांगितले.
समुपदेशनाचा मार्ग
काही कोविड रुग्ण बरे झाल्यानंतर बराच काळ या रुग्णांना विविध मानसिक समस्यांनी ग्रासलेले समोर येत आहे. त्यात घाबरल्यासारखे होणे, अतिकाळजी करणे, भीती वाटणे, गर्दीची भीती वाटणे अशा वेगवेगळ्या समस्या घेऊन रुग्ण समोर येत आहेत, अशा रुग्णांशी बोलून समुपदेशनाद्वारे प्राथमिक पातळीवर त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. अत्यंत तुरळक रुग्णांना औषधोपचारांची गरज भासत असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. नयन सुतार यांनी व्यक्त केले.