पालिकेच्या मराठी भाषा विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 08:26 PM2021-06-04T20:26:03+5:302021-06-04T20:26:30+5:30
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाची तपासणी करून येत्या आठ दिवसांत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचं दिलं आश्वासन
मुंबई : मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर या महत्त्वाच्या विषयावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाची तपासणी करून येत्या आठ दिवसांत महापालिका आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल व तीन महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. तर याप्रकरणी शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद,आमदार,माजी महापौर सुनील प्रभू यांनी पाठपुरावा केला होता.यामुळे मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
महापालिकेच्या ठरावानुसार ही वेतनवाढ देण्यात यावी अशी मागणी घेऊन अनेक कर्मचारी संघटना तसेच कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक रित्या आमदार सुनिल प्रभु यांना भेटले होते. या पार्श्वभूमीवर सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षापर्यंत उपरोक्त अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत महापालिकेने २०१८ रोजी ठराव मंजूर केला आहे. या ठरावा नुसार पूर्व अनुमतीने मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात यावी. या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता कर्मचाऱ्यांनी वेळ व पैसा खर्च केला असून, काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे माय मराठीसाठी महापालिकेचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी आमदार सुनील प्रभू यांनी काल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे दृकश्राव्य बैठकीत मागणी केली. तर या महत्त्वाच्या विषयावर मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विषयाची तपासणी करून येत्या आठ दिवसात महापालिका आयुक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल व तीन महिन्यांत अंमलबजावणी करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १००% वापर व्हावा त्याचप्रमाणे महापालिकेचा व्यवहार जास्तीत जास्त सोपा , सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावा व मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी मराठी भाषा विषयामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत महापालिकेने ठराव मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने परिपत्रक प्रसृत करण्यात आलेले आहे . या परिपत्रकान्वये मुंबई महानगरपालिकेतील अनेक कर्मचाऱ्यांनी मराठी भाषा विषयामध्ये पदव्यूत्तर पदवी प्राप्त केलेली असून त्याप्रमाणे संबधित आस्थापनांना लेखी स्वरुपात कळविलेले आहे. परंतु संबंधितांना सदर वेतनवाढ आज मितीपर्यंत देण्यात आलेली नाही याकडे आमदार प्रभू यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष वेधले.