मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका पदव्युत्तरच्या प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 07:44 PM2024-06-29T19:44:59+5:302024-06-29T19:45:06+5:30

शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन लिंक उपलब्ध करण्यास विलंब

Post graduate students affected by Mumbai University's mismanagement | मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका पदव्युत्तरच्या प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना

मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका पदव्युत्तरच्या प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या गलथान कारभाराचा फटका जवळपास ६० पदव्युत्तर विभागांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱया हजारो विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर विभागांमध्ये पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २७ जूनपासून ऑनलाईन शुल्क भरायचे होते. मात्र, शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन लिंकच वेळेत उपलब्ध न झाल्याने विद्यार्थी शुल्क भरू शकले नाहीत. अखेर २७ जूनला विद्यापीठाला परिपत्रक काढून लिंक भरण्याची मुदत २९ जूनपर्यंत वाढवावी लागली आहे. विद्यापीठाने मात्र लिंक उपलब्ध न झाल्याने प्रवेशास विलंब झाल्याची बाब नाकारली आहे.

विद्यापीठाने २२ मेपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली. यानुसार २६ जूनला प्रवेशाची पहिली यादी लावण्यात आली. या विद्यार्थ्यांना २७ जून ते १ जुलैपर्यंत ऑनलाईन शुल्क जमा करायचे होते. तसेच संबंधित विभागांना वर्ग १ जुलैपासून सुरू करावयास सांगण्यात आले होते. मात्र, २७ जूनला शुल्क भरण्याकरिता ऑनलाईन लिंकच काम करत नव्हती, अशी तक्रार एका प्रवेशोच्छुक विद्यार्थ्याने केली. यामुळे प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडून गेले आहे. नव्या वेळापत्रकानुसार २९ जून (सायंकाळी ५ नंतर ) ते ३ जुलैदरम्यान ऑनलाईन शुल्क भरण्याकरिता मुदत देण्यात आली आहे. गंमत म्हणजे वर्ग आधीच्या तारखेनुसार, म्हणजे १ जुलैपासूनच सुरू करायचे आहे.

विद्यापीठाच्या संबंधित आयटी विभागाला कळविले न गेल्याने ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यास विलंब झाल्याची माहिती विद्यापीठातील सूत्रांनी दिली. विद्यार्थी शुल्क भरण्यास गेल्यानंतर कुठे हा गोंधळ लक्षात आला. या अशा गलथान कारभारामुळे विद्यापीठाच्या विभागात प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी नाईलाजाने अन्य कॉलेजांमध्ये किंवा विद्यापीठांकडे वळतात. हे जाणीवपूर्वक केले जाते का, हे तपासण्याची गरज आहे, असा संशय एका विभागातील प्राध्यापकांनी व्यक्त केला.

या गोंधळाबाबत विद्यापीठाचे उपकुलसचिव (जनसंपर्क) लीलाधर बनसोड यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी मुंबई व राज्याबाहेरील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शुल्क भरण्याचा कालावधी बदलल्याचा खुलासा केला. शुल्क भरण्यासाठीची लिंक वेळेत उपलब्ध झाली नसल्याची बाबही त्यांनी नाकारली. पाच वाजल्यापासून (शनिवारी) लिंक सुरळीतपणे सुरू झाली आहे आणि विद्यार्थी ऑनलाईन शुल्क भरू शकतात, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Post graduate students affected by Mumbai University's mismanagement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.