महापौरपदासाठी मोेर्चेबांधणी
By admin | Published: May 2, 2015 05:05 AM2015-05-02T05:05:15+5:302015-05-02T05:05:15+5:30
महापौरसह महापालिकेतील महत्त्वांच्या पदांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच सुरू आहे.
नवी मुंबई : महापौरसह महापालिकेतील महत्त्वांच्या पदांसाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी सर्वाधिक रस्सीखेच सुरू आहे. अनेक पराभूत उमेदवारांनी स्वीकृत नगरसेवक पदासाठी वशिलेबाजी सुरू केली आहे.
महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, ५ स्वीकृत सदस्य व स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवड करण्यासाठी ९ मेला विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. महापालिकेतील महत्त्वांच्या पदांवर वर्णी लावण्यासाठी सर्वच इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नेत्यांकडे थेट अथवा मध्यस्थांमार्फत वशिलेबाजी सुरू केली आहे. महापौरपदासाठी सुधाकर सोनावणे यांचे नाव आघाडीवर आहे. परंतु, आतापर्यंत गणेश नाईक यांच्या राजकारणाकडे पाहिले तर पदासाठी ज्यांची सर्वाधिक चर्चा होते त्यांना बगल देऊन आयत्यावेळी अनपेक्षित चेहऱ्यास संधी दिली जाते. त्यामुळे राष्ट्रवादी पुरस्कृत सदस्य महापौर होणार की राष्ट्रवादीच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्यांना संधी मिळणार हे पुढील चार दिवसांत स्पष्ट होणार आहे. उपमहापौरपदासाठी काँगे्रसचे अविनाश लाड व सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या हेमांगी सोनावणे यांचे नाव आघाडीवर आहे. सभागृहनेतेपदासाठी पुन्हा एकदा जे.डी. सुतार यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. सर्वाधिक चुरस विरोधी पक्षनेतेपदासाठी सुरू आहे. शिवसेनेमध्ये गटबाजीचे राजकारण सुरू आहे. विजय चौगुले, विजय नाहटा, निष्ठावंत व निवडणुकीच्या तोंडावर संघटनेत आलेले अशा चार गटांमध्ये संघटना विभागली गेल्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठीच विरोधाचे राजकारण सुरू असल्याची चर्चा आहे.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वाधिक रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी व काँगे्रस आघाडीचे तीन सदस्य व शिवसेना - भाजपाचे दोन सदस्य निवडून येऊ शकतात. काँगे्रसमधून दशरथ भगत, संतोष शेट्टी व रमाकांत म्हात्रे यांच्यामध्ये चुरस आहे. शिवसेनेमध्ये विठ्ठल मोरे यांच्या नावाची चर्चा आहे. परंतु संघटनेमधील एक गट त्यांच्यावर प्रचंड नाराज आहे. याशिवाय त्यांना यापूर्वीही एकदा स्वीकृत सदस्य करण्यात आले होते. सभागृहात चांगली बाजू मांडत असले तरी सभागृहाबाहेर संघटना वाढीसाठी त्यांनी फारसे प्रयत्न केले नसल्याचा आक्षेप घेतला जात आहे. उपमहापौर अशोक गावडे यांच्या विरोधात फक्त ३ मतांनी हरलेल्या समीर बागवान यांना संधी दिली जाण्याची मागणीही होऊ लागली आहे. पक्षाचे नेते या दोघांपैकी एकाला संधी देणार की नवीन चेहऱ्यास संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. स्थायी समितीसाठी १६ सदस्यांची निवडही ९ मेलाच केली जाणार आहे. पालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या या समितीवर वर्णी लावण्यासाठी नेहमी रस्सीखेच असते. परंतु, महापालिकेच्या तिजोरीत पैशांचा ठणठणाट असल्यामुळे व वर्षानंतर एक तृतीयांश सदस्य निवृत्त होत असल्यामुळे पहिल्या वर्षी समिती नको अशी भूमिका काही जणांनी घेतली आहे.