स्नेहा मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: अनेकदा ऑफिसला पोहोचण्याच्या नादात पोस्टाची काम राहून जातात. तसेच, टपाल कार्यालय लवकर बंद होत असल्याने कामे रखडतात. यावर तोडगा काढत आता मुंबईच्या विभागाने शहर उपनगरातील टपाल कार्यालये थेट सकाळपासून संध्याकाळपर्यंत खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता ऑफिसमधून घरी आल्यावर टपाल कार्यालयातून जाऊन काम करणे नोकरदार मुंबईकरांसाठी सोयीचे ठरणार आहे.
मुंबईतील सुमारे ६० टपाल कार्यालये सकाळी ८ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत असणार आहेत, याची घोषणा ९ ऑक्टोबरच्या जागतिक टपाल दिनानिमित्त करण्यात येणार आहे. याकरिता, मुंबईच्या टपाल विभागाने शहर उपनगरातील टपाल कार्यालयांचा आढावा घेतला. त्यानंतर अधिकाधिक रहिवासी क्षेत्रातील टपाल कार्यालयांची निवड करण्यात आली. मुंबईच्या सहा परिमंडळांतील एकूण साठ टपाल कार्यालयांचा यात समावेश आहे. दिवसभर सेवा देणाऱ्या टपाल कार्यालयांत मुंबई पूर्व क्षेत्रातील दहा, पश्चिम क्षेत्रातील दहा, दक्षिण मुंबईतील तीन, उत्तर मुंबईतील दहा, उत्तर पूर्व क्षेत्रातील बारा आणि उत्तर पश्चिम क्षेत्रातील दहा कार्यालयांचा समावेश आहे.
नागरिकांचा चांगला प्रतिसाद
मुंबई क्षेत्रात मोठ्या संख्येने सामान्य नागरिक असल्याने कार्यालयीन वेळांमुळे टपाल कार्यालयाची काम करण्यास विलंब होतो. परिणामी, आठवड्याच्या अखेरीस टपाल कार्यालयांमध्ये रांगा लागतात. त्यामुळे टपाल कार्यालयातील कार्यप्रणाली अधिकाधिक सुलभ करण्यासाठी आणि मुंबईकरांना त्यांच्या सोयीप्रमाणे टपाल विभागाच्या सेवा -सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही टपाल कार्यालयांमध्ये वेळेचा विस्तार करण्यात आला असून याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. -स्वाती पाण्डेय, पोस्टमास्टर जनरल, मुंबई क्षेत्र.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"