लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार प्रत्येक खासगी रुग्णालयात दर्शनी भागात दरपत्रक लावणे आवश्यक आहे. मात्र, अनेक शहरातील बहुतांश रुग्णालये याचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी २०२१ मध्ये राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने याबाबत अधिसूचना जारी करत सर्व खासगी रुग्णालयांना दर्शनी भागात दरपत्रक लावणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्यापही या रुग्णालयांनी ही अधिसूचना गांभीर्याने घेतली नसून लवकरच याबाबत महापालिकेचा आरोग्य विभाग कडक कारवाई करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खासगी रुग्णालयात उपचाराचे दर हे एकसमान नसून जो तो आपापल्या पद्धतीने त्यांचे शुल्क आकारत असतो. त्यामुळे अनेकवेळा रुग्ण तेथे गेले की त्या रुग्णाला उपचाराच्या शुल्काची माहिती नसते. त्यामुळे अनेकवेळा रुग्ण भरती झाल्यानंतर त्याच्या नातेवाइकाला जेव्हा बिल दिले जाते त्यावेळी अचानक मोठ्या रकमेचे बिल आल्याने त्याची भंबेरी उडते. अशावेळी रुग्णाच्या नातेवाइकाला या ठिकणी इतका खर्च येणार आहे हे माहिती असल्यास रुग्णाला त्या रुग्णालयात दाखल करायचे की नाही याचा निर्णय त्याला घेणे शक्य होते.
प्रत्येक शहरातील महापालिकेचा आरोग्य विभाग बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार नोंदणी करून घेत असतो. तसेच त्याच्या अंमलबजावणीचे काम पाहत असतो. विशेष म्हणजे जवळपास १३०० रुग्णालयांनी या कायद्याअंतर्गत नोंदणी केली आहे.
दर्शनी भागात दरपत्रक लावणे बंधनकारकबॉम्बे नर्सिंग होम कायदा १९४९ आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने सुधारित केलेला महाराष्ट्र शुश्रूषागृह नोंदणी (सुधारित ) नियम २०१२ नुसार ११ (क्यू ) मध्ये रुग्ण हक्क संहिता देण्यात आली असून त्यामधील आय - नुसार रुग्णालयात पुरविण्यात येणाऱ्या सेवा उपचार, त्याचे आकारण्यात येणारे सर्व प्रकारचे दर सविस्तर दर्शविणारे दरपत्रक छापील स्वरूपात शुश्रूषागृहाच्या मुख्य दर्शनी भागात ठळकपणे लावावे.
दक्षिण मुंबई आणि मुंबई उत्तर मुंबई या भागातील पाच रुग्णालयांची पाहणी केली असता एकाही रुग्णालयाने दर्शनी भागात दरपत्रक लावले नव्हते. विशेष म्हणजे रुग्ण भरती होण्यासाठी गेल्यावर त्यांच्या नातेवाइकांना ॲडमिशन काउंटरवर गेल्यावर ते कोणती खोली घेणार याचे दर सांगत होते. मात्र, त्याला लागून येणारा उपचाराच्या खर्चाचा अंदाज ते सांगत नव्हते. दोन वर्षांपूर्वी सर्व रुग्णालयांना त्या नियमाचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर कोरोनाची साथ सुरू झाली. तो नियम तर आहे, आम्ही यामध्ये आता लक्ष घालू.- डॉ. दक्षा शहा, कार्यकारी आरोग्य अधिकारी, मुंबई पालिका सार्वजनिक आरोग्य विभाग