पोस्टल मतपत्रिका झाल्या डिजिटल; १० दिवस आधी मतपत्रिका पाठविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 01:23 AM2019-03-25T01:23:18+5:302019-03-25T01:23:30+5:30
राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजारांहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून, त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरीत्या मतपत्रिका पोहोचविल्या जाणार आहेत.
मुंबई : लष्कर, केंद्र आणि राज्य राखीव दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स), तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सीस्टिम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ८ हजारांहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून, त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरीत्या मतपत्रिका पोहोचविल्या जाणार आहेत.
ईटीपीबीएस यंत्रणा २०१६ मध्ये सर्वप्रथम पद्दुचेरी येथील नेल्लीथोप पोटनिवडणुकीत वापरण्यात आली होती. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका आॅनलाइनरीत्या सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचविल्या जातात. मतदानाच्या साधारणत: दहा दिवसांपूर्वी सर्व्हिस वोटर्सना ईटीपीबी यंत्रणेद्वारे आॅनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास त्यामुळे वाचणार आहे. या मतपत्रिका डाउनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. पोस्टल मते पाठविण्यासाठी टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते.
यांना घेता येईल लाभ
सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान, केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान, निवडणूक कालावधीत राज्याबाहेर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलांमधील जवान, जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी, परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
सर्व्हिस वोटर्सची संख्या : नागपूर (८०६), भंडारा-गोंदिया (२,६१२), गडचिरोली-चिमूर (१,२३९), चंद्रपूर (१,५५६), यवतमाळ-वाशिम (१,३१९), वर्धा (१,३२५), रामटेक (१,५८४), हिंगोली (१,१३१), नांदेड (१,४२२), परभणी (१,२५९), बीड (४००८), उस्मानाबाद (३,३२१), लातूर (२,९७५), सोलापूर (१,५९१), बुलडाणा (३,८२३), अकोला (३,२६६), अमरावती (२,४३५), जालना (२००५), औरंगाबाद (१,२९०), जळगाव (५,६४०), रायगड (१,३३०), पुणे (६९६), बारामती (२,०९३), अहमदनगर (६,६८३), रावेर (१,८१२), माढा (४,३५४), सांगली (५,६९२), सातारा (८,७०१), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (९८०), कोल्हापूर (५,७३८), हातकणंगले (३,७०९), नंदुरबार (९०२), धुळे (३,०५७), दिंडोरी (३,८५१), नाशिक (२,६३८), पालघर (२७४), भिवंडी (२८५), कल्याण (४७१), ठाणे (५३४), मुंबई उत्तर (११७), मुंबई वायव्य (१४७), मुंबई ईशान्य (३१७), मुंबई उत्तर मध्य (१३३), मुंबई दक्षिण मध्य (१९२), मुंबई दक्षिण (२२०), मावळ (५९७), शिरुर (१,८१८) आणि शिर्डी (२,४८७).