मुंबई : ग्रामीण डाकसेवकांच्या वेतन व सेवा शर्तीमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या संपामध्ये अद्याप कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. या मागण्यांची त्वरित दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा २९ मेपासून राज्यातील पोस्ट कर्मचारी या संपाला पाठिंबा म्हणून संपावर जातील, असा इशारा भारतीय पोस्टल एम्प्लॉइज फेडरेशनने पोस्ट विभागाला नोटीस पाठवून दिला आहे. नऊ संघटनांच्या फेडरेशनने हा इशारा दिला आहे. डाकसेवकांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय फेडरेशनने घेतला असून, आम्ही पूर्ण ताकदीने त्यांना साथ देऊ, असा निर्धार भारतीय पोस्टल एम्प्लॉइज असोसिएशन (पोस्टमन, एमटीएस)चे सरचिटणीस एस. एस. जाधव यांनी व्यक्त केला.ग्रामीण डाकसेवकांच्या वेतन व सेवा शर्तींमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या कमलेशचंद्र यांच्या समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागणीसाठी देशभरातील डाकसेवक सोमवारपासून संपावर गेले आहेत. संपाला आठवडा उलटल्यानंतरही त्यामध्ये कोणताही तोडगा अद्याप काढण्यात आलेला नाही. संपामध्ये राज्यातील सुमारे १७ हजार ग्रामीण डाकसेवकांचा समावेश असल्याने त्याचा फटका पोस्टाच्या कामकाजाला बसत आहे.भारतीय डाक कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली भारतीय खातेबाह्य कर्मचारी संघाने पुकारलेल्या या संपाची दखल घेऊन लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, अशी मागणी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बापू दडस यांनी केली आहे. याबाबत सोमवारी दिल्लीमध्ये पुन्हा बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. देशातील डाक कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देऊन, दोन वर्षे उलटली असली तरी याच खात्यामध्ये ग्रामीण डाकसेवकांच्या वेतनाचा व सेवा शर्तींचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे.कमलेशचंद्र यांच्या समितीने मे २०१७ आपला अहवाल सादर केला होता. डाकसेवकांना सध्या मिळणाºया चार ते पाच हजारांच्या वेतनामध्ये वाढ करून त्यांचे वेतन १० ते १४ हजार करावे, नोकरीत कायम करावे, यासह विविध शिफारसी समितीने केल्या आहेत.
टपाल कर्मचारी २९ मेपासून संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:36 AM