कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 06:18 AM2024-11-15T06:18:18+5:302024-11-15T06:18:41+5:30

कुलाब्यातून ४ हजार पोलिस मतदान करणार आहेत. 

Postal voting of 4000 policemen in Colaba | कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!

कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!

लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्यक्षात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना टपाली मतदानाला गुरुवारपासून सुरुवात झाली असून, कुलाब्यातून ४ हजार पोलिस मतदान करणार आहेत. 

निवडणूक कर्तव्यावरील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या सात मतदारसंघांत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानासाठी उभारलेल्या सुविधा केंद्रामध्ये प्रारंभ करण्यात आला. १६ नोव्हेंबरपर्यंत सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत पोलिस कर्मचाऱ्यांना टपाली मतदान करता येणार आहे. धारावीत केवळ गुरुवारीच टपाली मतदान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. वडाळ्यात १५ ते १७ नोव्हेंबर, वरळीत १६ ते १७ नोव्हेंबर, माहीम मतदारसंघात १६ नोव्हेंबर रोजी टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सर्वाधिक मतदान का? 
राज्यातील इतर भागात मतदान असणारे मात्र कर्तव्यासाठी कुलाब्यात काम करणारे ४ हजार पोलिस कार्यरत आहेत. कारण, कुलाबा मतदारसंघात पोलिस महासंचालक कार्यालय, मंत्रालय, विधानभवन,  मुंबई पोलिस मुख्यालय, काही मंत्र्याची निवासस्थान, कुलाबा पोलीस स्टेशन यांचा समावेश आहे. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्तासाठी पोलीस बाहेरून आले आहेत. त्यामुळे तुलनेने मुंबई शहराच्या इतर मतदारसंघापेक्षा या ठिकाणी पोलिस टपाली मतदानाची संख्या अधिक असल्याची माहिती कुलाबा विधानसभा निवडणूक कार्यालयातून देण्यात आली आहे.

Web Title: Postal voting of 4000 policemen in Colaba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.