मुंबई : संशोधन क्षेत्रात नवनवीन संशोधने होत असतात. तरुण पिढीही यात अग्रेसर आहे. त्यामुळे संशोधक क्षेत्राची उद्योग क्षेत्राशी नाळ जोडण्यासाठी राज्यस्तरीय विज्ञान विषयावरील संशोधनात्मक पोस्टर स्पर्धा चेंबूरच्या व्ही.ई.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केली होती. या स्पर्धेत राज्यासह गुजरात आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील एकूण ३२ महाविद्यालयांतील ६०० हून अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण विज्ञान, लाइफ सायन्स, सूक्ष्मजीवशास्त्र आणि फायटोकेमिकल्स असे पाच विभाग बनवण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान २७५ हून अधिक पोस्टर्सचे सादरीकरण करण्यात आले.स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पना, संकल्पना, विचार पोस्टरच्या माध्यमातून मांडले. संशोधनात्मक उद्योग क्षेत्राशी विद्यार्थ्यांची नाळ जोडून या दोहोंचा परस्पर फायदा करून देणे ही या उपक्रमामागील मूळ कल्पना व हेतू होता. अशा स्पर्धांत विद्यार्थी दशेत सहभागी झाल्याने विज्ञानाविषयी कुतूहल वाढते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थी संशोधन हा विषय निवडून विविध विषयांतील चांगली संशोधने करू शकतात, असे मत व्ही.ई.एस. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री फडणीस यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध व कुशल परीक्षकांसमोर आमचे संशोधन सादर करण्यासाठीचे हे उत्तम व्यासपीठ आहे, असे मत या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी मांडले. (प्रतिनिधी)
संशोधनाची आवड निर्माण करणारी पोस्टर स्पर्धा
By admin | Published: January 22, 2017 2:50 AM