मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा घोळ अद्याप संपलेला नाही. अजूनही हजारो विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यातच पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत शनिवारी संपल्याने विद्यार्थी तणावात होते. पण आता पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत ३१ आॅगस्टपर्यंत वाढवण्यात आल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केले आहे.मार्च-एप्रिल महिन्यात पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा संपल्या. त्यानंतर विद्यापीठाच्या नियमानुसार, पुढच्या ४५ दिवसांत निकाल जाहीर व्हायला पाहिजे होते. पणयंदा घेतलेल्या सर्व पदवीपरीक्षांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी आॅनलाइन करण्याचा निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी घेतला.त्यानंतर एप्रिल महिन्यात निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली. पण या प्रक्रियेला पहिल्यांदा अत्यल्प प्रतिसाद मिळाला.कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी तरीही सर्व शाखांच्या सर्व अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासणीचा निर्णय घेतला आणि त्यात सातत्याने येत असणाºया तांत्रिक अडचणी आणि अन्य अडचणींमुळे आॅगस्ट महिन्यातही उत्तरपत्रिका तपासणी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परदेशी अथवा अन्य राज्यात पदव्युत्तर शिक्षण घेण्याची संधी हुकत असल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत.बीए आणि बीएसीचे काही निकाल जाहीर झाले आहेत. पण काही विद्यार्थ्यांचे निकाल संकेतस्थळावर दिसत नाहीत. तसेच बी.कॉमच्या विद्यार्थ्यांचा अजून निकाल जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्नित असणाºया सर्व महाविद्यालयांना पत्रक पाठवून ही माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 3:14 AM