मुंबई : राज्यातील एमडी, एमएस यांसारख्या वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडे केली आहे. तसेच या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रबंध (थिसिस) सादर करण्यासही मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे.
.....
डिप्लोमा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या (एमएसबीटीई) अखत्यारित येणाऱ्या इंजिनिअरिंग व फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या हिवाळी परीक्षा; तसेच अल्प मुदतीच्या अभ्यासक्रमातील नियमित, बॅकलॉग विद्यार्थ्यांची हिवाळी प्रात्यक्षिक परीक्षा, थिअरी परीक्षा बहुपर्यायी (एमसीक्यू) स्वरूपात ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यानुसार डिप्लोमाच्या थिअरी परीक्षा २ ते २३ मार्च, प्रथम सत्र आणि थेट द्वितीय वर्ष इंजिनिअरिंग डिप्लोमा थिअरी परीक्षा २४ ते ३० मार्च, नॉन-एआयसीटीई अभ्यासक्रमांची थेअरी परीक्षा २ ते १२ मार्च दरम्यान होणार आहे.
.......
१०४ मनपा प्राथमिक शाळांना अनुदान मिळणार
मुंबई : मुंबई मनपाच्या अखत्यारितील १०४ खासगी प्रथमिक शाळांच्या अनुदानासाठी २५० कोटींच्या निधीची तरतूद मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला अनुदानाचा प्रश्न मार्गी लागला आहे.