- जमीर काझी मुंबई : राज्य पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सध्याच्या ठिकाणचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने बदलीच्या प्रतीक्षेत असताना अपर महासंचालक संदीप बिष्णोई यांची गेल्या साडेचार महिन्यांत तीन वेळा बदली केली आहे. बारा दिवसांपूर्वी त्यांची राज्य महामार्ग वाहतूक शाखेतून नियुक्ती केली असताना आता त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदी बदली केली आहे. गृह विभागाकडून मंगळवारी त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले.विशेष म्हणजे त्यांच्या समकक्ष दर्जाच्या पाच अधिकाºयांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कधीच पूर्ण झाला आहे, मात्र त्यांची बदली होण्याऐवजी बिष्णोई यांना झटपट तीन ठिकाणी पोस्टिंग देण्यात आली आहे. एका ठिकाणी साधारणपणे दोन वर्षांचा कालावधी असताना गृह विभागाकडून त्यांच्यावर दाखविण्यात आलेल्या या विशेष ‘मेहरबानी’वर वरिष्ठ अधिकाºयांतून चर्चा होत आहे. संदीप बिष्णोई हे १९८९ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. ३० मे रोजी त्यांची राज्य राखीव दलातून पोलीस मुख्यालयातील आस्थापना विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर ११ आॅक्टोबरला त्यांची राज्य वाहतूक महामार्ग येथे बदली करण्यात आली. त्यानंतर अवघ्या १२ दिवसांत त्यांची वैधमापन शास्त्र विभागाच्या नियंत्रकपदी बदली केली. त्यांच्या जागी सिडकोतील मुख्य दक्षता अधिकारी विनय कारगावकर यांची बदली करण्यात आली आहे.>पाच एडीजी मुदतपूर्तीनंतर त्याच ठिकाणीकार्यकाळ पूर्ण झालेले अपर महासंचालक दर्जाचे पाच अधिकारी सध्या बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यात एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी ( २६ मे २०१६), प्रशासन विभागाच्या प्रज्ञा सरवदे (१६ मे २०१६), जीएसटी विभागातील मुख्य दक्षता अधिकारी के. के. सारंगल ( १३ मे २०१६), बी. के. सिंग (१४ मे २०१६) आणि संजयकुमार वर्मा (२७ मे २०१६) यांचा समावेश आहे.>बिष्णोई यांच्या बदलीमागे कोणतेही विशेष कारण नाही. वरिष्ठ दर्जाच्या अधिकाºयांच्या बदल्या विचारपूर्वक कराव्या लागतात. इतर अधिकाºयांच्याही योग्य वेळी बदल्या केल्या जातील.- सुनील पोरवाल, अपर मुख्य सचिव, गृह विभाग
बिष्णोई यांना साडेचार महिन्यांत तीन ठिकाणी पोस्टिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 5:56 AM