मुंबई : आठ लाख रुपयांची लाच घेताना सव्वा वर्षापूर्वी रंगेहाथ पकडण्यात आलेले आयएएस अधिकारी अनिल रामोड यांचे निलंबन रद्द करीत राज्य सरकारने त्यांना पुन्हा सेवेत घेतले आहे. त्यांची नियुक्ती मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून बुधवारी करण्यात आली.
शेतकऱ्यांना जमिनीचा जादा मोबदला देण्याच्या बदल्यात लाच घेताना ९ जून २०२३ रोजी रामोड पकडले गेले होते. त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. त्यांना निलंबित करण्यात आले होते. आता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. याआधी मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव असलेले कुणाल कुमार हे अध्ययन रजेवर गेल्यापासून हे पद रिक्त होते. रामोड यांचा निलंबनाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर आता त्यांची या पदावर नियुक्ती देण्यात येत असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.