Join us

कोरोना काळात पोस्टमन काकांनी विणले अतूट नाते; मुंबईत २५ लाखांहून अधिक पत्रांचे वितरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2021 8:25 AM

दुसऱ्या लाटेत अखंड सेवा; दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीनंतर पत्रसेवा हळूहळू लोप पावत गेली. परंतु, टपाल विभागाने वेळोवेळी बदल स्वीकारत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाने माणसा-माणसांत शारीरिक अंतर तयार केले असले, तरी भावनिक दुरावा निर्माण करण्यात तो सपशेल अपयशी ठरला. नात्यांमधील वीण अतूट ठेवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या असंख्य हातांची मेहनत त्यामागे आहे. टपाल विभागातील पोस्टमन हा त्यातील एक महत्त्वाचा घटक. या वैश्विक महामारीलाही न डगमगता पोस्टमन काकांनी अखंड सेवा देत भावनिक संदेशवहनाचे काम केले.

दुसऱ्या लाटेत म्हणजेच एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाने उग्र रूप धारण केले असतानाही पोस्टमन काकांनी अखंड सेवा देत मुंबईत जवळपास २५ लाखांहून अधिक पत्रे आणि पार्सल घरपोच केली. मुंबई टपाल कार्यालयाच्या नोंदीनुसार एप्रिलमध्ये एकूण ४४ लाख ७५ हजार ४०७, तर मे महिन्यात ३५ लाख ८३ हजार ३१४ पत्रे आणि पार्सल जमा झाली.

दूरसंचार क्षेत्रातील क्रांतीनंतर पत्रसेवा हळूहळू लोप पावत गेली. परंतु, टपाल विभागाने वेळोवेळी बदल स्वीकारत आपले अस्तित्त्व टिकवून ठेवले. पार्सल आणि बँकिंग सेवेतही उडी घेतली. खासगी कंपन्यांनी देशभरात आपले जाळे तयार केल्यानंतर ग्राहक संख्येवर परिणाम झाल्याने पोस्टाच्या आवश्यकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मात्र, कोरोना काळात त्यांनी आपली आवश्यकता सिद्ध करून दाखवली. लॉकडाऊनमुळे राज्यभरात संपूर्ण वितरण व्यवस्था कोलमडली असताना टपाल कार्यालयाने अखंड सेवा देत ग्राहक हिताचा वसा कायम ठेवला.

चांद्यापासून बांद्यापर्यंत...एप्रिलमध्ये रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागल्याने निर्बंध कठोर करण्यात आले. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत गावी जाणाऱ्यांचा हिरमोड झाला. कोकणातले लोक गावी जाऊन आंबे, काजू, फणसांवर ताव मारतात. यंदा टपाल विभाग त्यांच्या मदतीला धावून आला. नातेवाईकांनी कोकणातून पाठविलेल्या आंब्याच्या पेट्या घरपोच करून अनेकांच्या घरात आनंदाची पेरणी केली. त्याशिवाय वाढदिवसाच्या भेटी, तयार कपडे, पुस्तकप्रेमींना त्यांच्या आवडीची पुस्तके पोहोचविण्याचे काम या काळात केल्याची माहिती साकीनाका येथील एका पोस्टमन काकांनी दिली.

मुंबईतील जमा लॉकडाऊनमुळे टपाल कार्यालयाने अखंड सेवा दिली. (पत्रे आणि पार्सल)एप्रिल - ४४,७५,४०७मे - ३५,८३,३१४मुंबईतील वितरण (पत्रे आणि पार्सल)एप्रिल - १३,९५,९७६मे - ११,११,९९८ 

टॅग्स :पोस्ट ऑफिसमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस