पोस्टमास्तर, एजंटकडून साडेचार कोटींची फसवणूक
By admin | Published: December 22, 2016 05:47 AM2016-12-22T05:47:29+5:302016-12-22T05:47:29+5:30
मीरा रोडच्या पोस्टातील गुंतवणुकदारांची फसवणूक प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मीरारोडच्या
मीरारोड : मीरा रोडच्या पोस्टातील गुंतवणुकदारांची फसवणूक प्रकरणी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मीरारोडच्या निलंबित पोस्टमास्तरसह दोघा लिपिकांना अटक केली असून त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. आतापर्यंत त्यांनी १३० गुंतवणुकदारांची ४ कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
यातील मुख्य आरोपी असलेल्या पोस्ट एजंट सीमा नितीन गोडे (४२) तिच्या सहकारी फजलीन शेख (३६) यांच्याकडून ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मीरारोडच्या पोस्ट आॅफिसमध्ये १९९८ पासून अधिकृत एजंट असलेल्या सीमा हिने आपली साथीदार फजलीन सोबत मिळून हा घोटाळा केला आहे. यात पोस्टाचे अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी असल्याचे स्पष्ट झाले. गोडे व फजलीन यांनी पोस्टाच्या मासिक गुंतवणूक योजना, मुदत ठेवीसारख्या योजनांमध्ये गुंतवण्यासाठी लोकांकडून पैसे घेतले. परंतु गुंतवणुकदारांच्या नावे खातीच उघडली नाहीत. ज्यांची खाती उघडली होती त्यांचे पैसे परस्पर काढून घेतले. अनेकांचे पैसे दुसऱ्या खात्यात तसेच बनावट बचत खाती उघडून हडप केले. लोकांना विश्वास बसावा म्हणून पोस्टाची पासबुक वा कार्ड दोघीही सहीशिक्क्यानिशी देत असत. अनेकांकडून आधीच पैसे काढण्याच्या स्लीप सह्या करुन घेतल्या. २० हजार रुपयांपर्यंत रोखीने रक्कम काढता येत असल्याने अनेकांच्या नावाने निघालेले धनादेश दुसऱ्यांच्या बनावट खात्यातून वळते करण्यात आले. नोटाबंदीनंतर अनेकांकडून लाखो रुपये पोस्टात भरण्यासाठी या दोघींनी घेतले होते.
मुदतीअंती ठेवी काढण्यासाठी आलेल्या गुंतवणुकदारांना आपल्या नावे पैसेच जमा नसल्याचे वा बचत खात्याद्वारे विड्रॉल स्लीपने मुदती आधीच काढून घेतल्याचे समजल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. या प्रकरणी फसगत झालेल्या गुंतवणुकदारांनी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्याकडे दाद मागितल्यानंतर पाटील यांच्या आदेशाने आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरु करत नयानगर पोलीस ठाण्यात सीमा व फजलीन विरुध्द गुन्हा दाखल करुन दोघींना अटक केली. आतापर्यंत १३० गुंतवणुकदारांचे ४ कोटी ५५ रुपये लुबाडण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
दरम्यान टपाल खात्याने निलंबित केलेले पोस्ट मास्तर विलास महाडिक (५४) रा. नालासोपारा ; लिपीक पुनित शेट्टी (३०) रा. मीरारोड व हेता पटेल (३१) रा. भार्इंदर यांचा देखील या फसवणुकीत सहभाग असल्याचे उघड झाले. गुन्हे शाखेने या तिघांनाही सोमवारी अटक केली असून न्यायालयाने त्यांना ५ दिवसांची कोठडी सुनावली. (प्रतिनिधी)