विधि अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकला, अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने विद्यार्थ्यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 02:15 AM2018-01-11T02:15:21+5:302018-01-11T02:15:29+5:30
मुंबई विद्यापीठात उन्हाळी परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाचा फटका अजूनही विद्यार्थ्यांना बसत आहे. विधि अभ्यासक्रमाचे वर्ग आॅक्टोबर महिन्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे ९० दिवसांच्या आधी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.
मुंबई : मुंबई विद्यापीठात उन्हाळी परीक्षेच्या निकालात झालेल्या गोंधळाचा फटका अजूनही विद्यार्थ्यांना बसत आहे. विधि अभ्यासक्रमाचे वर्ग आॅक्टोबर महिन्यात सुरू झाले आहेत. त्यामुळे ९० दिवसांच्या आधी परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. अभ्यासक्रम पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणाव वाढला असून, परीक्षा फेब्रुवारीत घेण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रात झालेल्या परीक्षांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन हे आॅनलाइन पद्धतीने करण्यात आले. आॅनलाइन मूल्यांकनासाठी मेरिट ट्रॅक कंपनीला कंत्राट देण्यात आले होते. या कंपनीला अनुभव नसल्याने निकालात अनेक अडचणी आल्या. उत्तरपत्रिकांच्या स्कॅनिंगपासून सुरू झालेला गोंधळ निकालापर्यंत लांबला. त्यातच विधि अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी प्राध्यापक मिळत नव्हते. या सगळ्याचा परिणाम विधि अभ्यासक्रमाचे निकाल लागण्यावर झाला. १९ सप्टेंबरला सर्व ४७७ निकाल जाहीर झाले, तरी विधि अभ्यासक्रमाच्या निकालाचा गोंधळ सप्टेंबर अखेर संपला.
त्यानंतर, आॅक्टोबर महिन्यात विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू झाले. विद्यापीठाच्या नियमानुसार, ९० दिवसांनंतर परीक्षा घेतल्या जातात, पण आता शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक जास्त पुढे जाऊ नये, म्हणून विद्यापीठ जानेवारी महिन्यात परीक्षा घेणार असल्याचे जाहीर केले, पण स्टुडंट लॉ कौन्सिलने या निर्णयाला विरोध केला आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, तसेच विद्यार्थ्यांना अभ्यास करायलाही पुरेसा वेळ मिळालेला नाही. हे लक्षात घेता, विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी असल्याचे कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी सांगितले.
... तर आंदोलन
अभ्यासक्रम पूर्ण न होताच परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल, शिवाय विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळेच परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात. या परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात यावे, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी दिला आहे.