‘सुशांतसिंह राजपूतच्या जीवनावरील चित्रपटाचे प्रदर्शन करण्यास स्थगिती द्या’
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:51 AM2021-02-19T03:51:09+5:302021-02-19T06:39:11+5:30
Sushant Singh Rajput : ‘न्याय : द जस्टिस’ चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणावी, यासाठी मनीष मिश्रा यांनी दिंडोशी न्यायालयात अर्ज केला. मात्र, दिंडोशी न्यायालयाने तिला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला.
मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या जीवनावर आधारित चित्रपट ‘न्याय : द जस्टिस’ प्रदर्शित करण्यास स्थगिती द्यावी, अशी विनंती करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली.
या चित्रपटावर कायमस्वरूपी बंदी आणावी, यासाठी मनीष मिश्रा यांनी दिंडोशी न्यायालयात अर्ज केला. मात्र, दिंडोशी न्यायालयाने तिला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. त्याविरोधात मिश्रा यांनी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले. उच्च न्यायालयाने या याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असे म्हणत मार्चमध्ये सुनावणी ठेवली.
मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाचे निर्माते सरला सरोगी सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. आत्महत्येचा तपास करण्यास राज्य सरकार कसे अपयशी ठरले, हे दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात केला आहे.
आपण सुशांतसिंह राजपूत व सध्या सत्तेत असलेल्या सरकारशी भावनिकरित्या जोडलेलो आहोत, असा दावा मिश्रा यांनी केला. मिश्रा यांच्या या याचिकेवर सरोगी यांनी आक्षेप घेतला. त्यांना याचिका दाखल करण्याचा अधिकार नसून त्यांनी ती वेळेआधी दाखल केली. कारण अद्याप चित्रपट प्रदर्शित झाला नाही, असे ते म्हणाले. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ठेवली आहे.