सर्व परीक्षा पुढे ढकला; आदित्य ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 03:49 AM2020-08-25T03:49:15+5:302020-08-25T08:34:08+5:30
शैक्षणिक वर्षाची सुरुवात जानेवारीपासून करावी
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घ्याव्यात की रद्द कराव्यात, यावरून महाराष्ट्रात बराच राजकीय वादंग झाला. त्यातच सोमवारी, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
विद्यापीठांसह अनेक संस्थांकडून परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. विद्यार्थी तसेच पालकांच्या हितासाठी पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी स्वत: टिष्ट्वट करून या पत्राची माहिती दिली. एक पेपर घ्यायचा म्हटले तरी विद्यार्थी, शिक्षक, कर्मचाऱ्यांसह राज्य शासनाची यंत्रणा त्यात जुंपावी लागते. शिवाय, जगभरात जिथे शाळा, महाविद्यालये उघडली तिथे कोरोनाचे संक्रमण वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी यात तातडीने हस्तक्षेप करीत प्रत्यक्ष अथवा आॅनलाइन परीक्षांसह सर्व शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलावेत, अशी मागणी ठाकरे यांनी केली आहे.
बहुतांश विद्यापीठांतील विद्यार्थांचे शैक्षणिक मूल्यांकन पूर्ण झालेले आहे. या मूल्यांकनात अंतिम परीक्षेला १० टक्क्यांपेक्षा जास्त महत्त्व नाही. त्यामुळे विद्यापीठांनी ठरविलेल्या निकषानुसार परीक्षा न घेता या विद्यार्थ्यांना पास करता येईल. विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी शैक्षणिक वर्षाची सुरुवात जून २०२० ऐवजी जानेवारी २०२१ पासून करण्याबाबत विचार करता येईल, असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.