मुंबई - रात्रभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे तर शाळा, महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत, त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
तर राज्य शासनाकडून मुंबईसह तीन जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असं सांगितले आहे.
मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्षाच्या कॉम्प्युटर सायन्सची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुंबईतील पावसामुळे रेल्वे वाहतुकीसोबत रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत.
कुर्ला परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी घुसलं आहे. कुर्ल्यातील कैलास प्रभात सोसायटीमध्ये तळमजल्यातील घरांमध्ये पावसाचं पाणी गेलं आहे.
मुंबई विमान सेवेलाही पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोमवारी रात्री जयपूर-मुंबई विमान लँडिंग दरम्यान रनवेवरुन घसरलं. सुदैवाने या घटनेत सर्व प्रवासी सुखरुप बचावले. तसेच विमानाचा मोठा अपघात टळला.