मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीत येणाऱ्या परिसरात दोन टप्प्यांत लोकसभेची निवडणूक होत आहे. त्यामुळे या निवडणूक काळातील काही परीक्षा तसेच काही परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी २२, २३ व २४ एप्रिल असे तीन दिवसतर दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी २९ व ३० एप्रिल असे पाच दिवसांचे पेपर तसेच या दिवशी सुरू होणाऱ्या काही परीक्षा पुढे ढकलण्यात येतील. परीक्षांच्या सुधारित तारखा तसेच वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल.मुंबई विद्यापीठाअंतर्गत पहिल्या टप्प्यात २३ एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे या जिल्ह्यांत तसेच सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशात, तर २९ एप्रिल रोजी मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर व रायगड (मावळ) या जिल्ह्यांत निवडणुका होत आहेत. विद्यापीठाअंतर्गत असलेली अनेक महाविद्यालये ही निवडणुकीची केंद्रे असल्याने निवडणुकीच्या एक दिवस आधी मतदान केंद्रांसाठी निवडणूक आयोग महाविद्यालये ताब्यात घेत असते. शिवाय विद्यापीठ व महाविद्यालयाचे शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी हे प्रत्यक्ष निवडणूक कामात सक्रिय सहभागी असल्याने मतदान झाल्यानंतर मतपेट्या जमा करेपर्यंतची जबाबदारी त्यांच्यावर असते. साहजिकच अनेकदा मतदानाच्या दुसºया दिवशी अनेक शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दुसºया दिवशीच्या परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यास उशीर होण्याची शक्यता असते. त्यामुळे काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.सीए परीक्षेतही बदललोकसभेच्या निवडणुकीमुळे इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट्स आॅफ इंडियातर्फे (आयसीएआय) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे. आयसीएआयतर्फे २ ते १७ मे दरम्यान घेतली जाणारी सीएची परीक्षा आता २७ मे ते १२ जून दरम्यान घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीमुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2019 6:09 AM