मुंबई : पालघर लोकसभा मतदार संघात येत्या २८ मे रोजी होऊ घातलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या दिवशी होणाऱ्या सर्व परीक्षा मुंबई विद्यापीठाने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या दिवशी विद्यापीठाच्या या जिल्ह्यात सात परीक्षा होणार होत्या. त्या आता २८ मे ऐवजी २ जून रोजी होतील, असे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.मुंबई विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी सत्र परीक्षा सध्या संलग्नित कॉलेजांमध्ये सुरू आहेत. यात मुंबई आणि कोकणासह पालघर जिल्ह्यातील कॉलेजांतही परीक्षा होणार आहेत. मात्र, स्व. चिंतामण वनगा यांच्या जागेवर २८ मे रोजी पालघर जिल्ह्यात लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे बहुतांश कॉलेज पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्र्र म्हणून निवडण्यात आले असून, मतदान करणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा फटका बसू नये, म्हणून विद्यापीठाने २८ मे रोजी होणाºया परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.२८ मे रोजी होणाºया विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये टीवाय बीकॉम वार्षिक पॅटर्न, एमकॉम सेमिस्टर दोन, एम.सी.ए. सेमिस्टर दोन, बी.ई. सेमिस्टर आठ, एसई सेमिस्टर तीन, बीकॉम सेमिस्टर पाच आणि बीकॉम अकाउंट्स अँड फायनान्स या परीक्षांचा समावेश आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यासंदर्भातील परिपत्रक मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने शुक्रवारी वेबसाइटवर जाहीर केले आहे. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्या, तरी परीक्षा केंद्र आणि परीक्षेच्या वेळेत कुठलाही बदल करण्यात आला नसल्याचेही विद्यापीठाने जाहीर केले आहे.>एमए (सेमिस्टर १)चा निकाल जाहीरविधि शाखेचे हिवाळी सत्रांच्या परीक्षांचे सगळे निकाल जाहीर केल्यानंतर, आता मुंबई विद्यापीठाने २०१८मधील उन्हाळी सत्रातील परीक्षेचे निकालही जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी विद्यापीठाकडून जानेवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या एमए (सेमिस्टर १) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत ७२.७६ % विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 5:53 AM