पुढे ढकललेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:51 AM2020-04-07T06:51:23+5:302020-04-07T06:53:20+5:30
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री; नियोजनासाठी समिती
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षा यापुर्वी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात या परीक्षांसंदर्भात संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर सर्व परीक्षांच्या नियोजन आणि नियंत्रणासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र, या परीक्षा रद्द केल्या जाणार नसून याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोमवारी दिली.
सामंत यांनी आज राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. यावेळी सामंत म्हणाले, विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी सेलकडून पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षा रद्द होणार नाहीत. अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व परीक्षेचे वेळापत्रक नव्याने जाहीर करण्यात येईल. या सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रणासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुहास पेडणेकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु शशिकला वंजारी, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरू देवानंद शिंदे, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.अभय वाघ, उच्च तंत्रशिक्षण विभागाचे संचालक धनराज माने यांची समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून महाविद्यालयीन परीक्षेचे वेळापत्रक नियोजन, शैक्षणिक वषार्चे नियोजन असा अहवाल देईल. यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही मंत्री सामंत यांनी संगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांमध्ये विविध आजारासंदर्भातील चाचण्या घेता येतील अशा बहुउपयोगी लॅब सुरू करण्याच्या सूचनाही सामंत यांनी आजच्या बैठकीत दिल्या. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने अशी लॅब सुरू केली आहे. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन आणि आरोग्य विभागाच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या तातडीने देण्यात येतील. अन्य विद्यापीठांनी आपल्याकडे अशा प्रकारच्या लॅब सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी राज्य शासनाकडून सर्व परवानग्या देण्यात येतील अशी ग्वाही सामंत यांनी दिली.