ठाणे : बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील खटल्यातील विशेष सरकारी वकील राजा ठाकरे ठाणे न्यायालयात गैरहजर राहिले. सरकारी वकिलांची ही खेळी असून धूर्तपणाने त्यांनी खासगी कारण दाखवून येथे अनुपस्थित राहत तिकडे जामिनाला आव्हान दिले आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात बार कौन्सिलकडेही तक्रार करू, असा पवित्रा अॅड. सावंत यांनी घेतला. विशेष सरकारी वकिलांच्या क्लृप्तीने आरोपींचे वकील तसेच नगरसेवकांचे समर्थक अचंबित झाले. परमार प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष नजीब मुल्ला यांना १५ फेब्रुवारी रोजी सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला. विक्रांत चव्हाण, सुधाकर चव्हाण आणि हणमंत जगदाळे यांचे अर्ज प्रलंबित आहेत. दरम्यान, सुधाकर चव्हाण यांच्या जामिनासाठी सकाळी ११.३० ते दुपारी २.३० अशी तीन तास अॅड. हेमंत सावंत यांनी बाजू मांडल्यानंतर दुपारी ३ वा. अॅड. ठाकरे हे बाजू मांडतील, अशी अपेक्षा होती पण ते गैरहजर होते. त्यानंतर, अचानक नजीब मुल्ला यांच्या जामीन अर्जाला मुंबई उच्च न्यायालयात पोलिसांनी आव्हान दिल्याची माहिती मुल्ला यांच्यासह उर्वरित आरोपींच्याही वकिलांना मिळाली. त्यावर, विशेष सरकारी वकील अनुपस्थित असल्याने तिघांच्याही जामीन अर्जावर मंगळवारी सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केल्याने नगरसेवकांची पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मंगळवारी पुन्हा ठाणे जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांच्या न्यायालयात तिन्ही नगरसेवकांचे अर्ज सुनावणीस येतील, तेव्हा सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात केलेल्या अर्जाचा हवाला देत विरोध केला जाईल. उच्च न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत या तिघांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर करू नये, अशी विनंती पोलिसांकडून केली जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)सुनावणी लांबल्याने नाराजीसुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांची न्यायालयातून सोमवारी हमखास जामिनावर सुटका होईल, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. त्यामुळे न्यायालयात त्यांनी तोबा गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला, सुहास देसाई आदी या वेळी उपस्थित होते. मात्र, सुनावणी लांबणीवर पडल्याने त्यांच्यात नाराजी पसरली.
‘त्यांच्या’ अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2016 1:13 AM