मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या विधि शाखेच्या एलएलएमच्या सेमिस्टर १ आणि सेमिस्टर २ची एकाच दिवशी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय परीक्षा विभागाने घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या विरोधानंतर आणि स्टुडंट लॉ कौन्सिलनेदेखील परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केल्यानंतर, विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. परीक्षा विभागाच्या या निर्णयामुळे एलएलएमच्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.सुधारित वेळापत्रकानुसार, २३ मे रोजी होणारी परीक्षा ४ जून रोजी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. परीक्षा केंद्रांमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर जाहीर केले आहे. मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन मूल्यांकनामुळे निर्माण झालेल्या निकाल गोंधळामुळे विद्यापीठाच्या एलएलएम अभ्यासक्रमाचे प्रवेश उशिराने झाले होते. त्या वेळी विद्यापीठाने दहा दिवसांतच परीक्षा जाहीर केल्याने, अनेक विद्यार्थ्यांनी न्यायालयाची पायरी चढली होती. या वेळी न्यायालयाने या विद्यार्थ्यांना नापास न करता, त्यांची परीक्षा नंतर घेण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र, सेमिस्टर १ आणि २च्या परीक्षा २३ मे रोजी ३ ते ६ या वेळेत एकाच वेळी ठेवल्याने शेकडो विद्यार्थी अडचणीत आले होते.
एलएलएमची परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 5:55 AM