Join us

विद्यापीठाच्या स्थगित परीक्षा उद्यापासून सुरू, संचालनालयाच्या दट्ट्यानंतर विद्यापीठ बॅकफूटवर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2023 3:49 PM

विद्यापीठाने याआधी जाहीर केलेले परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवत येत्या सोमवारपासून वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होणार आहेत. तसेच ३ व ४ फेब्रुवारी रोजी स्थगित झालेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे. 

मुंबई : अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या परीक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या आंदोलनामुळे शुक्रवार, ३ फेब्रुवारीपासून स्थगित झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या सर्व परीक्षा सोमवार, ६ फेब्रुवारीपासून निर्धारित वेळापत्रकानुसार सुरू होत आहेत. कर्मचारी संप मागे घेत नसतील तर त्यांना नोटिसा बजावण्याच्या सूचना उच्च शिक्षण संचालनालयाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी शुक्रवारी सूचना कुलगुरूंना केल्या. त्यानंतर मुंबई विद्यापीठ प्रशासनाकडून तातडीने कार्यवाही करत स्थगित केलेल्या परीक्षा सोमवारपासून पुन्हा सुरू होण्याचे जाहीर केले आहे.  विद्यापीठाने याआधी जाहीर केलेले परीक्षांचे वेळापत्रक कायम ठेवत येत्या सोमवारपासून वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा होणार आहेत. तसेच ३ व ४ फेब्रुवारी रोजी स्थगित झालेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक लवकरच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित केले जाणार आहे. या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठाने आवश्यक सर्व तयारी केली आहे, अशी माहिती विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी दिली. दरम्यान राज्यातील इतर विद्यापीठांच्या भूमिकेकडे ही विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा फटका राज्यातील लाखो विद्यापीठ तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना बसत आहे. 

परीक्षा पुढे ढकलल्या तर पुढील शैक्षणिक वर्षाच्या वेळापत्रकावरही त्याचा परिणाम होण्याची भीती विद्यार्थी पालकांना सतावत होती. त्यामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान नको, अशी भूमिका घेत उच्च शिक्षण संचालनालयाने राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंना परीक्षा वेळेवर घेण्यासाठी उपाययोजना व आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळणारउच्च शिक्षण संचालनालयाच्या पत्रानंतर विद्यापीठ प्रशासनाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, विद्यार्थी हिताचाच आहे. परीक्षा वेळेवर झाल्या तर शैक्षणिक वर्षाचे नुकसान टळणार आहे. - ॲड. सचिन पवार, युवा सेना (शिंदे गट)

टॅग्स :मुंबई विद्यापीठमुंबईराज्य सरकार