एसटी कर्मचाऱ्यांवरील आवेदन पद्धतीला स्थगिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:08 AM2020-03-02T06:08:12+5:302020-03-02T06:08:22+5:30
एसटी महामंडळाकडून नवीन शिस्त व आवेदन कार्यपद्धती लागू करण्यात आली होती.
मुंबई : एसटी महामंडळाकडून नवीन शिस्त व आवेदन कार्यपद्धती लागू करण्यात आली होती. याविरोधात मान्यताप्राप्त संघटनेच्या सूचना लक्षात न घेता, जबर शिक्षा असलेली शिस्त आणि आवेदन पद्धती कामगारांवर लादली गेली. मात्र या शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीला औद्योगिक न्यायालयाने स्थगिती दिली आहे.
एसटी महामंडळाकडून नवीन शिस्त व आवेदन कार्यपद्धती मान्यताप्राप्त संघटनेला विश्वासात न घेता लागू केली. दंडात्मक नियम व वागणुकीची नवीन शिस्त आवेदन कार्यपद्धती १ जून २०१९ पासून लागू केली. शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली होती. ही कारवाई कायमस्वरूपी तत्त्वावर होती. त्यामुळे कामगारांमध्ये तीव्र संताप होता.
नवीन शिस्त आणि आवेदन कार्यपद्धतीत मान्यताप्राप्त संघटनेला डावलून निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मान्यताप्राप्त संघटनेने याविरोधात प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करून सूचना करण्यात आल्या. मात्र सूचनांची अंमलबजावणी न झाल्याने मान्यताप्राप्त संघटनेने औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयाने नुकतीच या नवीन जाचक शिस्त आणि आवेदनाला स्थगिती दिली आहे, तर जुनीच शिस्त व आवेदन कार्यपद्धती सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
२००५ मध्ये ईटीआयएम मशीन एसटीमध्ये कार्यरत नव्हत्या. त्यामुळे ईटीआयएम मशीनसंदर्भात होणाºया अपहारासंदर्भात गुन्ह्याचे स्वरूप व त्यासंबंधी शिक्षा याबाबत प्रशासनाकडे चर्चा करण्यात येणार आहे. यासंदर्भात निर्णय प्रशासनाकडून न घेतल्यास पुन्हा न्यायालयात जाऊ, असे मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.