Join us

पुण्यातील आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाई स्थगित करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याच्या कारवाई स्थगित करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन हे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत अतिक्रमीत घरे पाडण्याची कारवाई सुरु असल्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे तणाव निर्माण झाला होता. त्याची दखल घेऊन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाने आज दूरदृष्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पदुम मंत्री सुनील केदार, झोपु प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेद्र निंबाळकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांची घरे पाडण्याची कारवाई होत आहे ती तत्काळ थांबवावी. तसेच ऐन पावसाळ्यात त्यांना बेघर करु नये, त्यासाठी पर्यायी व्यवस्था करून बाधितांना कायमची घरे देण्यात यावी, अशा सूचना डॉ. निलम गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या. यावर, कुणालाही बेघर करणार नाही, हीच शासनाची भूमिका आहे. सद्यस्थितीत ज्यांची घरे पाडण्यात आली आहेत त्यांचे पुनर्वसन केले जात असून, येत्या काळात त्यांना हक्काची घरे देण्याबाबत शासनाची सकारात्मक भूमिका आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री शिंदे यांनी दिली. या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच निलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्यासाठी बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.