मुंबईतील १० उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांना स्थगिती, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी राजकारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 06:46 AM2020-07-06T06:46:43+5:302020-07-06T06:48:07+5:30

बदल्यांना दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर रात्री त्यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Postponement of internal transfers of 10 Deputy Commissioners in Mumbai, Politics for preferred officers | मुंबईतील १० उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांना स्थगिती, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी राजकारण

मुंबईतील १० उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्यांना स्थगिती, मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी राजकारण

Next

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी १० पोलीस उपायुक्तांच्या केलेल्या अंतर्गत बदल्यांना राज्य शासनाने रविवारी स्थगिती दिली आहे. यामुळे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राजकीय वाद असल्याची चर्चा होऊ लागली आहे. या निर्णयामुळे पोलीस आयुक्तांना मात्र झटका बसला आहे.

बदल्यांना दिलेल्या स्थगितीच्या निर्णयानंतर पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी मातोश्रीवर रात्री त्यांची भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये झालेल्या बैठकीतील चर्चेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबतचा तपशील समजू शकला नव्हता.
मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाºयांना केंद्रातील नियुक्तीसाठी कार्यमुक्त केल्यानंतर या रिक्त जागा भरण्यासोबत मुंबई पोलीस दलातील १० पोलीस उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. यात परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त परमजीत दहिया यांना दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या अशा परिमंडळ एकची जबाबदारी देण्यात आली. परिमंडळ एकचे उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांची मुंबई पोलीस मुख्यालयात आॅपरेशनचे उपायुक्त म्हणून बदली केली. तर, संरक्षण विभागाचे उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे परिमंडळ सातच्या उपायुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली.
परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नियती ठाकेर-दवे यांच्या जागी आॅपरेशनचे उपायुक्त प्रणय अशोक यांची, तर परिमंडळ तीनचे उपायुक्त अभिनाशकुमार यांच्या जागी मुंबई पोलीस मुख्यालयातील पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांची नियुक्ती करण्यात आली. एन. अंबिका यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागी सशस्त्र पोलीस बल ताडदेवचे उपायुक्त नंदकुमार ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली. पोर्ट परिमंडळाच्या उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांची मुंबईच्या सायबर उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. विशेष शाखा एकचे उपायुक्त गणेश शिंदे हे पोर्ट परिमंडळाचे नवे उपायुक्त बनले होते. गुन्हे शाखेचे उपायुक्त शहाजी उमाप यांची विशेष शाखा एकचे उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली, तर परिमंडळ अकराचे उपायुक्त डॉ. मोहन दहिकर यांना पुन्हा एकदा गुन्हे शाखेच्या उपायुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली. तर त्यांच्या जागी सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांची नेमणूक करण्यात आली होती.
पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून बदली झालेल्या या अधिकाºयांनी लगेचच पदभार स्वीकारला. त्यांचे फोटोही टिष्ट्वटरवर झळकले. सर्व काही आलबेल असताना, रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयातून या बदल्यांना स्थगिती दिल्याचे आदेश जारी करण्यात आले. देशमुख यांनी स्वत: याबाबत टिष्ट्वट करून माहिती दिली.
पोलीस आयुक्तांचे बदली आदेश रद्द करताना सर्वांना आधीच्या जागेवर तत्काळ रुजू होण्यास बिनतारी संदेशाद्वारे सांगण्यात आले आहे. दोन उपायुक्तांची केंद्रात प्रतिनियुक्तीवर बदली झाल्याने त्या रिक्त जागांचा अतिरिक्त कार्यभार प्रणय अशोक आणि एन. अंबिका यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यानुसार रविवारी सर्वांनी आपल्या आधीच्या ठिकाणचा पदभार स्वीकारला.
फक्त दोन उपायुक्तांना केंद्रीय प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले. अन्य दहा उपायुक्तांच्या अंतर्गत बदल्या पोलीस आयुक्तांच्या अखत्यारीत येत होत्या. मात्र राज्य शासनाने यात हस्तक्षेप केल्याने पुढच्या बदल्याही शासनाच्या मर्जीतल्या असतील, असा काहीसा इशाराही यातून दिल्याचे बोलले जात आहे.

मुंबईमध्ये चांगल्या ठिकाणी पोस्टिंग मिळवण्यासाठी पोलीस अधिकाºयांची धडपड सुरू असते. त्याची ही स्पर्धा या स्थगिती आदेशांमध्ये दिसून येते. बहुतांश वेळा बड्या अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये राजकीय हस्तक्षेप दिसून येतो. सध्या राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे पोलीस दलातील वरिष्ठ आणि उच्चपदस्थ अधिकाºयांच्या बदल्यांमध्ये राजकीय वाद दिसून येत आहेत.
पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पदभार स्वीकारताच माजी पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी केलेल्या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता या स्थगितीमुळे राज्य शासनाने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना हा मोठा झटका दिल्याचे बोलले जात आहे.
 

Web Title: Postponement of internal transfers of 10 Deputy Commissioners in Mumbai, Politics for preferred officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.